लष्कराच्या कॅम्पमधून चंदनाची चोरी, नगर शहरातील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लष्कराच्या सीक्यूए कॅम्पमधून चंदनाच्या झाडांची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, चंदन चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अपर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांची भेट घेतली आहे.

सीक्यूए कॅम्पचे सिक्युरिटी इन्चार्ज संजीवकुमार पिल्लई (वय 51) यांनी फिर्याद दिली आहे. पिल्लई हे ड्युटीवर असताना दि. 13 रोजी कॅम्प परिसरात झाडे फोडण्यासाठीची हत्यारे मिळून आली. त्यांनी संशयितांचा शोध घेतला असता कोणीही मिळून आले नाही. त्यानंतर सोमवारी (दि. 14) पेट्रोलिंग सुरू असताना चंदनाची तीन ते चार वर्षांची पाच झाडे चोरट्यांनी कापून नेल्याचे निदर्शनास आले. त्याठिकाणी झाडे कापण्यासाठीची दोन हत्यारेदेखील मिळाली होती. परिसराची पाहणी केली असता कॅम्पच्या भिंतीला छिद्र आढळून आले आहे. त्यातूनच आरोपी आतमध्ये येऊन झाडे कापून नेत असल्याचा संशय आहे. आरोपींनी तीन ते चार वर्षांची चंदनाची पाच झाडे कापून त्यातील आठ हजार रुपयांचा गाभा चोरून नेला आहे.

नगर शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल कातकाडे आणि तोफखाना पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलीस नाईक पठाण तपास करीत आहेत.