
वादळ नाही,पाऊस नाही असं वातावरण असताना जयगड येथील नावेद-2 ही मच्छिमार नौका बुडाली कशी, असाप्रश्न उपस्थित होत आहे. समुद्रात मालवाहू जहाजाला धडक बसून अपघात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या नौकेच नेमकं काय झाले याचा शोध जीपीएस यंत्रणा घेणार आहे. तपास यंत्रणेची भूमिका महत्वाची ठरणार आहे.
26 ऑक्टोबर रोजी पहाटे 5 वाजता नावेद-2 ही मच्छिमार नौका मासेमारीसाठी गेली होती. त्यानंतर या नौकेचा संपर्क तुटला. या नौकेवर खलाशी व तांडेल दगडू गोविंद नाटेकर, गोकुळ तुकाराम नाटेकर, अनिल गोविंद आंबेकर, सुरेश धाकू कांबळे (सर्व, रा. गुहागर) तालुक्यातील साखरीआगर गावाचे रहिवासी असून दत्तात्रय सुरेश झगडे (रा. अडूर) व अमोल गोविंद जाधव (रा. मासू) असे सहाही खलाशी व तांडेल गुहागर तालुक्यातील होते. नौकेवरील कुणाचाही संपर्क होत नसल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. तीन दिवसानंतर नौकेवरील एका खलाशाचा मृतदेह सापडला. उर्वरित पाच खलाशी अद्याप बेपत्ता आहेत.
वादळ किंवा पाऊस नसताना नौका बुडाली किंवा बेपत्ता कशी झाली असा प्रश्न उपस्थित होत आहे. समुद्रात मालवाहू जहाजाला धडक बसून अपघात झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. नौकेवरील जीपीएस यंत्रणा नक्की समुद्रात काय झालं, हे सांगणार आहे. सध्या या प्रकरणाचा पोलीस यंत्रणा तपास करत असून जेएसडब्ल्यू पोर्टने आवश्यक असलेली सर्व माहिती पोलीस यंत्रणेला दिल्याचे जेएसडब्ल्यू पोर्टने सांगितले आहे.
ही शेवटची ट्रिप ठरली
नावेद-2 नौकेवरील खलाशांनी 26 ऑक्टोबरला मासेमारीला निघण्यापूर्वी ही शेवटची ट्रिप मग नंतर दिवाळीला सुट्टी घ्यायची असं ठरवलं होतं. मात्र, दुर्देवाने ती त्यांची शेवटची ट्रिप ठरली.अजूनही पाच खलाशी बेपत्ता आहेत.






























































