
देशभरात सुरू असलेल्या कोरोनाच्या दुसऱया लाटेत मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्याही पुन्हा वाढू लागली असून आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीतील रुग्णसंख्या रोखण्यासाठी मिशन धारावी अधिक तीव्र करण्यात येणार आहे. त्याचबरोबर लसीकरण आणि कोरोना चाचण्यांवर भर देण्यात येणार आहे, अशी माहिती जी-उत्तरचे साहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.
मुंबईत गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून यात शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या दादर, माहीम आणि धारावीत रुग्ण आणि सक्रीय रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर, चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली असून लक्षणे असलेल्या आणि पॉझिटिव्ह असून लक्षणे नसलेल्या रुग्णांनाही कोरोना सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे. धारावी मॉडेलच्या ट्रेसिंग, ट्रकिंग, टेस्टिंग आणि ट्रिटिंग या 4 टी वर भर देण्यात येत असून पालिकेच्या नियमाप्रमाणे कोरोना रुग्ण सापडणारे मजले सील केले जात आहेत तर पाचपेक्षा जास्त रुग्ण सापडणाऱया इमारती कन्टेनमेंट झोन घोषित करण्यात येत आहेत. त्याचबरोबर लसीकरणावर मोठय़ा प्रमाणात भर देण्यात येत आहे.
पालिकेचे धाराकीतील डॉक्टरांना आवाहन
धारावीतील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन राबवल्या जात असलेल्या विविध मोहिमांमध्ये सक्रीय सहभाग घेण्याचे आवाहन पालिकेने स्थानिक डॉक्टरांना केले आहे. कोरोना सेंटरमध्ये गर्दीचे नियोजन करण्यासाठी स्वयंसेवक पुरवा, कोरोना केंद्रात रुग्णांवर देखरेख करण्यासाठी 9 ते 6 दरम्यान या वेळेत तुमच्या सवडीने सेवा द्या तसेच सामान्यांना को-विन ऍपवर नोंदणी करण्यासाठी तुमच्या दवाखान्यात मदत करा, असे आवाहन जी-उत्तर विभागाचे पालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. वीरेंद्र मोहिते यांनी केले आहे.
जी–उत्तर विभागात रुग्णसंख्या वाढली
जी-उत्तर विभागात येणाऱया धारावीत आज 40 रुग्ण सापडले तर सक्रीय रुग्णांची संख्या 180 वर पोहोचली आहे. दादरमध्ये 57 रुग्ण सापडले असून सक्रीय रुग्णांची संख्या 297 वर पोहोचली आहे तर माहीममध्ये 71 रुग्ण सापडले असून सक्रीय रुग्णांची संख्या 377 वर पोहोचली आहे. जी-उत्तर विभागात एकूण 15 हजार 397 रुग्ण असून 854 सक्रीय रुग्ण आहेत.
दादर स्थानकाजवळ अँटीजेन चाचण्या
कोरोनाला रोखण्यासाठी आजपासून गर्दीच्या ठिकाणी कोरोना चाचण्या करण्यात येत असून पश्चिम रेल्वेच्या दादर (पूर्व) स्थानकाजवळ आज पालिकेच्या वतीने फेरीवाले, खासगी सुरक्षारक्षक आणि सर्वसामान्य असे मिळून 68 जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. यात 7 जणांना कोरोना पॉझिटिव्ह सापडले. पॉझिटिव्ह रुग्णांना कोरोना केंद्रात दाखल करण्यात आल्याची माहिती साहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.



























































