
>> अभिषेक भटपल्लीवार
चंद्रपूर महानगरपालिका नेहमी चर्चेत असते. कधी चांगल्या उपक्रमांसाठी तर कधी हलगर्जीपणासाठी. कधी कडक कारवाईसाठी तर कधी कानाडोळा करण्यासाठी. त्यामुळे नागरिकांचे लक्ष नेहमी मनपाकडे असते. मनपाची विकासकामे देखील लक्ष वेधतात तर नागरिकांना जागरूक करणाऱ्या संदेश फलकावर नजरा खिळतात. असाच एक मौलिक संदेश फलक सद्या नागरिकांचे लक्ष वेधत आहे. परंतू या फलकावरील मजकुराने विशेषतः नृत्यप्रेमींना दुःखी केले आहे. मनपात सर्व अधिकारी व कर्मचारी सुशिक्षत असतांना असा प्रकार घडला कसा हा आता संशोधनाचा विषय आहे, अशा प्रतिसाद नागरिक देत आहेत.
उन्हाळा संपला अन पावसाची सुरुवात झाली. जिल्ह्यात आज सर्वत्र मुसळधार पावसामुळे हाहाकार आहे. घरातून कुलर बाहेर पडण्यापूर्वीच मेघराजाने थैमान घातले. त्यामुळे सर्व स्थानिक स्वराज्य संस्थानीं रोगराई पसरू नये म्हणून लोकांना जागरूक करणे सुरू केले. या दिवसांत डासांचा प्रकोप होऊ नये म्हणून मनपाने प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह चौकात एक भला मोठा संदेश फलक झळकवला, मागील महिन्याभरा पासून हा फलक जनतेला ‘डास ऐवजी डांस’ उत्पत्ती स्थाने नष्ट करण्याचा संदेश देत आहे. तो ही सांस्कृतिक सभागृहाच्या चौकात. महत्वाचे म्हणजे या चौकातून महानगरातील अधिकांश मंडळी रोज येजा करते, तरीही शासकीय अधिकाऱ्यांचे विशेषतः मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लक्ष जाऊ नये..?यांस काय म्हणावे, अशा प्रतिक्रिया येत आहेत
मनपा अधिकारी मराठी विसरले का..?
मनपाने त्या फलकावर , ‘उपचारापेक्षा प्रतिबंध बरा, शहरातील डांस उत्पत्ती स्थाने नष्ट करा. शनिवार दिवस माझा, कोरडा दिवस पाळा’, असा संदेश दिला आहे. इतर नागरिकांनी याचा योग्य अर्थ लावला असला तरी नृत्यक्षेत्रात महत्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या कलाकारांनी यावर तीव्र आक्षेप नोंदवत मनपा अधिकारी व कर्मचारी मराठी विसरले काय..?असा प्रश्न उपस्थित केला आहे.




























































