
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
ट्वेण्टी-20 वर्ल्ड कपमधील उपांत्य फेरीतील फियास्कोचे पडसाद हिंदुस्थानी महिला क्रिकेट संघावर उमटताना दिसत असून मंगळवारी मिताली राज हिने पहिल्यांदाच या प्रकरणावर मौन सोडले आहे. हिंदुस्थानची सर्वात अनुभवी खेळाडू मिताली राज हिने प्रशासकीय समितीच्या डायना एडुल्जी व मुख्य प्रशिक्षक रमेश पोवारवर गंभीर आरोप केले आहेत. बीसीसीआयमधील काही दिग्गज मंडळी माझी कारकीर्द संपवायचा, उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे तिने यामध्ये स्पष्टपणे म्हटले आहे. तिने याबाबत बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी व महाव्यवस्थापक साबा करीम यांच्याकडे पत्राद्वारे आपला राग व्यक्त केला आहे.
‘20 वर्षांच्या करीअरमध्ये पहिल्यांदाच माझा आत्मविश्वास खचला, मला नैराश्य आले. मी केलेल्या देशाच्या सेवेला खरंच इतकीही किंमत नव्हती का की काहीजण सत्तेचा वापर करून मला संपवायला निघालेत, असा विचार करायला त्यांनी मला भाग पाडले,’ असे मितालीने पत्रात लिहिले आहे. ‘टी-20 कर्णधार हरमनप्रीत कौरच्या विरोधात मला काही बोलायचे नाही. फक्त इतकेच की तिने मला टीमबाहेर काढण्याच्या प्रशिक्षकांच्या निर्णयाला पाठिंबा दिला, ते मला फारच दुखावणारे होते,’ असे मिताली राजने हरमनप्रीतबद्दल स्पष्टपणे सांगितले.
प्रशिक्षकांकडून अपमानित
ट्वेण्टी-20 वर्ल्ड कपसाठी वेस्ट इंडीजमध्ये पाऊल ठेवताच प्रशिक्षक रमेश पोवार मला दुर्लक्षित करताहेत हे प्रकर्षाने जाणवले. त्यांनी वारंवार मला अपमानित वागणूक दिली. नेटमध्ये इतर खेळाडू फलंदाजी करीत असताना रमेश पोवार तिथे उभे राहायचे, पण मी नेटमध्ये फलंदाजी करायला गेल्यास ते तिथून निघून जायचे. मी त्यांच्याशी बोलायला गेले तर ते फोनमध्ये बिझी व्हायचे किंवा तिथून निघून जायचे, असे मिताली राजने पत्रात म्हटले आहे.
तू ग्राऊंडवर येऊ नकोस
रमेश पोवारांच्या वागणुकीबद्दल मिताली राज पुढे म्हणाली, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याआधी झालेल्या बैठकीनंतर रमेश पोवार माझ्या रूमवर आले आणि म्हणाले, तू ग्राऊंडवर येऊ नकोस. तिथे मीडिया असेल. त्यानंतर सर्वात महत्त्वाच्या लढतीसाठी मी संघासोबत नसल्याचा मला धक्का बसला. इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य लढतीतही मला वगळण्यात आले. माझ्या डोळय़ांमधून अश्रू वाहू लागले. 20 वर्षे देशाची सेवा केल्याचे फळ मला या स्वरूपात मिळाले, असे ती पुढे म्हणाली.
एडुल्जी यांनी केला पदाचा गैरवापर
मिताली राजने डायना एडुल्जीवर तोफ डागली. ती म्हणाली, मला एडुल्जीबद्दल आदर आहे, पण त्या त्यांच्या पदाचा माझ्याविरोधात वापर करतील असा मी कधी विचारही केला नव्हता. एडुल्जी प्रशासकीय समितीत आहे. मी एक साधी क्रिकेटपटू आहे. त्यामुळे पत्रद्वारे जे मी हे लिहीत आहे याचा परिणाम माझ्या कारकीर्दीवर होऊ शकतो हे मला माहीत आहे.





























































