मिठी नदीची सफाईदेखील धिम्या गतीने, महिनाभरात 43 टक्के नालेसफाईचे आव्हान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पावसाळा अवघ्या महिन्यावर आला असताना मुंबईत दोन महिन्यांत केवळ 57 टक्केच नालेसफाई झाली आहे. अजूनही अनेक नाले गाळाने भरलेले आहेत. त्यामुळे शिल्लक 43 टक्के काम एका महिन्यात पूर्ण करण्याचे आव्हान पालिकेसमोर आहे. नालेसफाईत मिठी नदीच्या स्वच्छतेचे कामही धिम्या गतीने सुरू असून फक्त 43 टक्के काम पूर्ण झाले आहे.

पावसाळापूर्व कामांमध्ये पालिकेकडून मुंबई शहर, पश्चिम उपनगर, पूर्व उपनगर आणि मिठी नदीमधील गाळ काढला जात आहे. यंदा पावसाळय़ापूर्वी एकूण 9 लाख 82 हजार 426 मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यापैकी आतापर्यंत 5 लाख 58 हजार 877 मेट्रिक टन म्हणजे निर्धारित उद्दिष्टाच्या 56.89 टक्के गाळ काढण्यात आला आहे. पावसाळय़ापूर्वी 31 मेपर्यंत हे टार्गेट पूर्ण करण्याचे पालिकेचे उद्दिष्ट आहे. मात्र 6 मार्चपासून नालेसफाईचे काम सुरू झाल्यानंतर दोन महिने उलटले तरी अजून 43 टक्क्यांवर काम बाकी असल्याने पालिकेला काम वेगाने करावे लागणार आहे. दरम्यान, निश्चित केलेल्या उद्दिष्टानुसार 31 मेपर्यंत काम पूर्ण केले जाईल, असा विश्वास अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी व्यक्त केला.

गरज भासल्यास अतिरिक्त मनुष्यबळ नेमा

  • गेल्या वर्षी कोरोना काळ असल्याने नालेसफाई उशिरा म्हणजेच 21 एप्रिल रोजी सुरू झाली होती. त्यामुळे कंत्राटदारांनी तीन पाळय़ांमध्ये काम करावे, असे निर्देश पालिका आयुक्त प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी दिले होते. शिवाय नालेसफाईवर वचक राहण्यासाठी त्रयस्त संस्थेची नेमणूकही करण्यात आली होती.
  • या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्तांनी या वर्षीदेखील 31 मेपर्यंत नालेसफाईचे काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक तिथे अतिरिक्त मनुष्यबळ आणि अतिरिक्त यंत्रणा नेमून काम पूर्ण करावे, असे निर्देश दिले आहेत. तर निश्चित उद्दिष्टांपैकी जादा गाळ काढण्यात येईल, असा विश्वास पालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

कंत्राटदारांवर प्रशासनाची नजर

  • नालेसफाईचे काम परिणामकारक होण्यासाठी कंत्राटदारांना काम सुरू होण्यापूर्वी, प्रत्यक्ष काम सुरु असताना आणि काम संपल्यानंतर अशा तिन्ही टप्प्यांमध्ये प्रत्यक्ष दिनांक, वेळ, अक्षांश, रेखांश (रिअलटाईम जिओ टॅग) यासह चित्रफीत व छायाचित्रे तयार करून ती सॉफ्टवेअरवर अपलोड करणे बंधनकारक करण्यात आले आह
  • नाल्याकाठची दैनंदिन छायाचित्रे, गाळ डंपरमध्ये भरण्यापूर्वी डंपर पूर्ण रिकामा असल्याचे दर्शविणारे चित्रण, गाळ वाहून नेल्यानंतर क्षेपणभूमीवर आलेल्या व जाणाऱया डंपर वाहनांच्या क्रमांकाची तसेच वेळेची नोंद करणे, क्षेपणभूमीवर वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा उभारणे ही सर्व जबाबदारी कंत्राटदारांकडून करून घेण्यात येत आहे.