आमदार देवेंद्र भुयार यांना तीन महिने कारावासाची शिक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमरावती जिह्यातील वरुड-मोर्शी मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार यांना तीन महिने कारावास शिक्षा ठोठावण्यात आली आहे. गटविकास अधिकाऱयांच्या अंगावर माईक आणि पाण्याची बाटली फेकून मारहाण केल्या प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयाने आमदार भुयार यांना ही शिक्षा ठोठावली आहे.

आमदार देवेंद्र भुयार यांनी 2019 मध्ये जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत बेनोडा गावाच्या पाण्याच्या प्रश्नावरून गटविकास अधिकारी सुभाष बोपटे यांच्या अंगावर माईक आणि पाणी बॉटल फेकून मारली होती. त्यानंतर तत्कालीन कार्यकारी मुख्य अधिकारी मनीषा खत्री यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आज जिल्हा न्यायाधीश एस.एस.अडकर यांच्या न्यायालयाने आमदार देवेंद्र भुयार यांना कलम 353 भा.दं.वि. अन्वये 3 महिने कारावास आणि 15 हजार रुपये दंडाची शिक्षा दिली आहे.

उच्च न्यायालयात दाद मागणार

बेनोडा गावाचा पाणीपुरवठय़ाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असतांना माझ्यावर गुन्हा दाखल केला. मला अटक करण्यात आली, त्यावेळी मला 8 दिवसाची सजा झाली. त्यानंतर गावाची पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली ती योजना आज कार्यान्वितसुद्धा झाली आहे. या प्रकरणामध्ये मला जी काही शिक्षा मिळाली ती मला मान्य आहे. या विरोधात मी उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार असल्याचे आमदार देवेंद्र भुयार यांनी म्हटले आहे.