
नगर जिल्ह्यातील अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके आणि विखे पिता-पुत्रातील वाद टोकाला गेला आहे. दोन्हीकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. अशातच लंके यांनी पुन्हा एकदा विखे-पाटलांवर हल्लाबोल केला आहे.
राज्यात आपण मंत्री आहात. नगर जिल्ह्याचे पालकत्व तुमच्याकडे आहे. आधी तुमच्या गावाला जाणारे रस्ते नीट करा, असा टोला आमदार निलेश लंके यांनी नाव न घेता विखे पिता-पुत्राला लगावला. स्वत: काही करायचे नाही. लोका सांगे ब्रह्मज्ञात, स्वत: कोरडे पाषाण, अशी त्यांची अवस्था असल्याचेही लंके म्हणाले.
माझे जाहीर आव्हान आहे की तुम्ही साडेचार वर्षातील कामाचा लेखाजोखा समोरासमोर घेऊन बसा, मी माझ्या कामाचा लेखाजोखा घेऊन बसतो, असे आव्हान लंके यांनी विखे-पाटलांना दिले. काहीतरी बातम्या छापून आणायच्या आणि श्रेय लाटायचे, असा टोलाही लंके यांनी लगावला. नगर-मनमाड रस्त्याच्या दुरावस्थेवरूनही लंके यांनी खासदार विखे-पाटलांना सुनावले.
मधल्या काळात कुठेतरी कामाला सुरुवात झाली, मात्र ते कामही बंद पडले. तुम्ही ज्या रस्त्याने घरी जाता तो रस्ता आधी नीट करा, मग दुसऱ्यांना उपदेशाचे डोस पाजा. स्वत: काही करायचे नाही. लोका सांगे ब्रह्मज्ञात, स्वत: कोरडे पाषाण, अशी त्यांची अवस्था असल्याचेही लंके म्हणाले.



























































