पावसाने केली एमएमआरडीएची ‘पोलखोल’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

रस्त्यांवर खड्डे पडू नयेत तसेच पावसाचे पाणी साचू नये यासाठी पुरेशी उपाययोजना केल्याचा दावा करणाऱया मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (एमएमआरडीए) पावसानेच ‘पोलखोल’ केली आहे. एमएमआरडीएच्या कामांमुळे अंधेरीतील रस्ते अक्षरश: खड्डय़ात गेले आहेत. रस्त्यांवर पडलेल्या खड्डय़ांमुळे पावसाचे पाणी साचून डबकी झाली आहेत. परिणामी स्थानिक नागरिक आणि पादचारी हैराण झाले असून वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे.

लिंक रोडवर एमएमआरडीएच्या वतीने रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या कामामुळे अंधेरी पश्चिम येथील लोटस पेट्रोल पंप आणि बेहरामबाग यादरम्यान एका बाजूच्या रस्त्यावर खड्डेच खड्डे झाले आहेत. या खड्डय़ांमध्ये पावसाचे पाणी साचत असून वाहनांना मार्गक्रमण करताना अडचणी येत आहेत. या खड्डय़ांबद्दल स्थानिक नागरिक सोशल मीडियावरून मुंबई महानगरपालिकेवर आरोप करत

  • पश्चिम द्रुतगती मार्गावरील वांद्रे ते गोरेगावर दरम्यानच्या रस्त्यावरही एमएमआरडीएच्या कामांमुळे खड्डे पडले आहेत. द्रुतगती मार्गाच्या दक्षिणेकडील जेव्हीएलआर उड्डाणपूल आणि अंधेरीच्या जोग उड्डाणपुलादरम्यानच्या रस्त्यावरही खड्डे पडले आहेत. एमएमआरडीएने पावसाळ्यात आपल्या कामांमुळे पाणी साचणार नाही याची काळजी घेतली जाईल आणि त्यासाठी उपाययोजना केल्याचा दावा केला होता. परंतु तो दावा फोल ठरल्याची चिन्हे खड्डय़ांच्या रूपात एमएमआरडीएच्या अखत्यारितील रस्त्यांवर दिसत आहेत. त्याबद्दल नागरिकांनी सोशल मीडियावरून एमएमआरडीएला जाब विचारण्याची गरज निर्माण झाली आहे.

गोरेगावमध्ये तीन फूट खड्डे

लोटस पेट्रोल पंप ते बेहरामबाग या मार्गावर २०० मीटरच्या टप्प्यात ३० ते ४० खड्डे पडले आहेत. मोटरसायकलस्वारांना तर या रस्त्यांवरून गाडी चालवणे कठीण होत आहे. खड्डय़ांमुळे रोज सायंकाळी या रस्त्यावर वाहतूक ठप्प होते. मेट्रो-७ मार्गाचे काम सुरू असलेल्या गोरेगाव पूर्वेच्या हब मॉलजवळील रस्त्याचीही दुर्दशा झाली आहे. पश्चिम द्रुतगती मार्ग आणि सर्व्हिस रोड दरम्यानच्या या रस्त्यावर तर दोन-तीन फूट खोल खड्डे पडले आहेत. त्यात अपघात होण्याची दाट शक्यता असल्याने एमएमआरडीएने त्या खड्डय़ांभोवती बॅरीकेड्स लावली आहेत.