
सामना प्रतिनिधी, मुंबई
सिंगापूर आणि हाँगकाँगप्रमाणेच मुंबईतील मेट्रो रेल्वेसाठी स्वतंत्र कंपनी स्थापन करण्याची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (एमएमआरडीए) योजना आहे. मेट्रोची वाहतूक आणि देखभालीची जबाबदारी या कंपनीची असेल. पुढील वर्षीपर्यंत या कंपनीची स्थापना करण्यात येणार आहे.
‘एमएमआरडीए’ने आपल्या अधिकाऱयांची दोन पथके अभ्यासदौऱयासाठी नुकतीच हाँगकाँग आणि सिंगापूरला पाठवली होती. तेथील मेट्रोचा कारभार दोन स्वतंत्र कंपन्यांकडे आहे. सिंगापूरमध्ये एसएमआरटी कॉर्पोरेशन तर हाँगकाँगमध्ये एमटीआर ही कंपनी मेट्रो रेल्वेचे काम पाहते. दिल्लीमध्येही दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळाची स्थापना केली गेली आहे. मुंबईतही ‘मेट्रो-2ए’ हा मार्ग सुरू झाल्यानंतर अशीच कंपनी कार्यरत होईल असे एमएमआरडीएकडून सांगण्यात आले.
स्थानकांपासून प्रवाशांना मेट्रोची खासगी वाहनांचीही सेवा
मुंबईत सध्या वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावर ‘मेट्रो-1’ कार्यरत आहे. तिचे काम रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या नेतृत्वाखाली ‘मेट्रो-1’ प्रायव्हेट लिमिटेड (एमएमआएपीएल) ही कंपनी पाहते. एमएमआरडीए आणि आर इन्फ्रा यांनी संयुक्तरीत्या ही कंपनी स्थापन केली आहे. त्यात आर इन्फ्रा या कंपनीचे 75 टक्के शेअर्स आहेत. मुंबई मेट्रोसाठी स्थापन करण्यात येणारी नवी कंपनी प्रवाशांना मेट्रोच्या स्थानकांपासून बसेस आणि खासगी वाहनेही पुरवू शकेल अशी एमएमआरडीएची योजना आहे.
summary- mmrda plannes separate company for metro




























































