
सामना प्रतिनिधी, मुंबई
शिवसेनेच्या पाठपुराव्याने एल्फिन्स्टन पुलाजवळ होत असलेल्या शौचालय बांधकामात अडथळा आणून पालिकेच्या अभियंत्यांना धक्काबुक्की करून काम बंद पाडल्याची घटना आज घडली. पालिका अधिकाऱयांना धक्काबुक्की करणारे मनसे आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असल्याचे समजते. दरम्यान, या मुजोरीविरोधात पालिकेने ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पालिकेच्या माध्यमातून बांधण्यात येणाऱया या पुलामुळे शेकडो नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे. मात्र हे काम शिवसेनेच्या माध्यमातून होत असल्यामुळेच मनसे-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जाणीवपूर्वक अडथळा आणत असल्याचे बोलले जात आहे. आज या शौचालयाचे बांधकाम सुरू असताना संबंधित दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले. या शौचालयामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होणार असल्याचे सांगत त्यांनी काम बंद पाडले. यावेळी पालिका अधिकाऱ्यांशी हुज्जत घालून त्यांना धक्काबुक्कीही करण्यात आली.
दरम्यान, यावेळीजी साऊथ वॉर्ड ऑफिसचे सहायक अभियंता रवी म्हस्के आणि आपल्याला धक्काबुक्की झाल्याचे अभियंता सुशांत गोडबोले यांनी सांगितले. दरम्यान, पालिका अधिकायांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.




























































