Lok sabha 2019 मनसे आमदार शरद सोनावणे यांचा शिवसेनेत जाहिर प्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

जुन्नरमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार शरद सोनावणे यांनी सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्ध ठाकरे यांचा आशीर्वाद घेऊन शिवसेनेत जाहिर प्रवेश केला. शिवसेना भवानमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवबंधन बांधलं. त्यांच्यासह जुन्नरमधील हजारो कार्यकर्त्यांनी शिवबंधन बांधलं. यावेळी शिवसेना नेते, उपनेते उपस्थित होते.

‘शरदजी शिवसेनेतून थोडे दिवस बाहेर होतात, परंतु तुमच्या मनातील भगवा उतरवला नव्हता. ज्याच्या मनामध्ये भगवा, ज्याच्या अंगामध्ये भगवे रक्त आहे, तो शिवसेनेतून बाहेर गेला तरी तो समाधानाने, आनंदाने राहू शकत नाही, तो एक ना एक दिवस परत येतोच’, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी शरद सोनावणे यांचे शिवसेनेमध्ये स्वागत केले. तसेच घरामध्ये रुसवे फुगवे होत असतात म्हणून कोणी घर पाडायला निघत नाही, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. आगामी लोकसभा आणि विधानसभेवर भगवा फडकणार असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी  यावेळी व्यक्त केला.

‘कोणावरही नाराज होऊन पक्ष सोडला नाही. शिवसेनेची, घरची ओढ लागल्याने मी शिवसेनेत आलो आहे’, अशी प्रतिक्रिया आमदार शरद सोनावणे यांनी दिली. शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा विजय होणार आणि महाराष्ट्रात भगवा फडकणार अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. यावेळी ‘शिवसेना झिंदाबाद’, ‘कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला’ अशा गगणभेदी घोषणा करत शिवसैनिकांनी सोनावणे यांचे स्वागत केले.