
मित्राच्या खूनामध्ये सहभागी असल्याच्या संशयातून तिघाजणांनी एकावर कोयत्याने वार करून त्याला गंभीररित्या जखमी केले. ही घटना 7 जूनला फरसुंगीतील गंगानगरजवळ घडली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
फुरसुंगीच्या गंगानगर येथे राहणाऱ्या राहूल रामचंद्र पुटगे (20) असे या अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचे दोन साथीदार फरार आहेत. श्रीकांत गायकवाड (32) असे जखमी इसमाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीकांत हे 7 जूनला दुचाकीवरून घरी चालले होते. त्यावेळी गंगानगर परिसरात राहूल पुटगे याने साथीदारासह श्रीकांतला अडविले. मित्र बसवराज कांबळे याच्या खूनात सहभाग असल्याच्या संशयातून श्रीकांतला त्यांनी जाब विचारला. यावेळी त्यांच्यावर कोयत्याने वार करून गंभीररित्या जखमी केले. यानंतर हातातील कोयते हवेत फिरवून मी इथला भाई आहे, असे म्हणत परिसरात दहशत निर्माण केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक ढावरे तपास करत आहेत.



























































