
कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील मोबाईल शॉपीचे पत्रे उचकटून चोरी करणाऱया तीन अल्पवयीन मुलांना गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्या ताब्यातून 2 लाख 87 हजार रुपये किमतीचे स्मार्ट फोन, स्मार्ट वॉच व रोख रक्कम असा मुद्देमाल पोलीस पथकाने हस्तगत केला आहे. शेखर रामदास बनसोडे (रा. श्रीरामनगर, मिरजगाव) यांनी फिर्याद दिली आहे.
मिरजगावमधील बावडकर कॉम्प्लेक्समध्ये परिसरात शेखर बनसोडे यांची मोबाईल शॉपी आहे. रविवारी (दि.5) रात्री या दुकानाच्या छताचे पत्रे उचकटून 1 लाख 86 हजार रुपये किमतीचे मोबाईल व स्मार्ट वॉच तसेच 1 लाख 88 हजार रुपयांची रोकड असा 3 लाख 74 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता. याबाबत मिरजगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुह्याचा समांतर तपास करताना हा गुन्हा आष्टी तालुक्यातील केळसांगवी येथील काही अल्पवयीन मुलांनी केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. अनिल कटके यांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या सूचनेवरून पथकाने बीड जिह्यातील आष्टी तालुक्यातील केळसांगवी येथे जाऊन तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. त्यांनी घराजवळील कोंबडय़ाच्या खुराडय़ात ठेवलेले गुह्यातील 1 लाख 1 हजार रुपये रोख व 1 लाख 86 हजार रुपये किमतीचे मोबाईल फोन व स्मार्ट वॉच असा एकूण 2 लाख 87 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून, आरोपींना मिरजगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल सुनील चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, संदीप पवार, बबन मखरे, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, शंकर चौधरी, रवि सोनटक्के, मेघराज कोल्हे व संभाजी कोतकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.




























































