
सामना प्रतिनिधी, कल्याण
रेल्वे प्रवाशांचे मोबाईल आणि अन्य किमती वस्तू चोरणाऱ्या टोळीला कल्याण जीआरपी क्राइम ब्रँचने बेडय़ा ठोकल्या आहेत. या टोळीकडून पोलिसांनी 1 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय. गेल्या काही दिवसांत मध्य रेल्वेच्या लोकल आणि एक्सप्रेस प्रवासात चोरीच्या घटना वाढल्या आहेत. या घटनांचा तपास करताना कल्याण जीआरपी क्राइम ब्रँचने चार जणांच्या टोळीला ठाणे रेल्वे स्थानकातून अटक केली.
अर्जुन भोसले ऊर्फ अर्जुन पगारे, अली शाहिद अन्सारी, अशोक धीवर अशी या टोळीतील तिघांची नावे असून यातील दोघे अवघे 19 वर्षांचे आहेत, तर एक आरोपी अल्पवयीन आहे. या सगळ्यांनी कल्याण, डोंबिवली, ठाणे, कर्जत या रेल्वे स्थानकांत गर्दीचा फायदा घेऊन अनेक प्रवाशांचे मोबाईल, पर्स, दागिने चोरल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून तब्बल 17 गुह्यांची उकल झाली आहे. या चोरलेल्या ऐवजापैकी 1 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून पुढील तपास सुरू आहे.
ठाण्यातही 351 मोबाईल हस्तगत
ठाण्यातही नऊ महिन्यांत तब्बल 351 मोबाईलचा शोध लावून 20 जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांच्या एका खास पथकाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मोबाईल चोरटय़ांचा शोध घेतला. एकूण 37 लाख 98 हजार 750 रुपये किमतीचे मोबाईल जप्त केले आहेत.



























































