
गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या सराईत संतोष जाधव टोळीविरूद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. त्याने व्यावसायिकाकडे 50 हजारांची खंडणी मागितल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या सूचनेनुसार टोळीविरूद्ध मोक्का कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
संतोष सुनिल जाधव (रा. पोखरी, ता. आंबेगाव), जिवनसिंग दर्शनसिंग नहार (रा. मंचर) , श्रीराम रमेश थोरात (रा मंचर), जयेश रतिलाल बहिरम (रा. घोडेगाव) गणेश तारू, वैभव ऊर्फ भोला शांताराम तिकटारे (रा.जळकेवाडी, चिखली), रोहित विठ्ठल तिटकारे (रा. सरेवाडी, नायफड, ता. खेड) , जिशान इलाहिबक्श मुंढे (रा. घोडेगाव, ता. अंबेगाव), सचिन बबन तिटकारे (रा. धाबेवाडी, नायफड, ता. खेड ) अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत.
सराईत संतोष जाधव टोळीने नारायणगावातील वॉटर प्लॅन्ट व्यावसायिकाकडे 50 हजारांची खंडणी मागितली होती. याप्रकरणी त्यांच्याविरूद्ध दाखल गुन्हयात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) नुसार कारवाईचा प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांना पाठविण्यात आला होता. त्यानुसार गुन्ह्यात मोक्का कलम वाढ करण्यास परवानगी देण्यात आली आहे. गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे करीत आहेत. प्रस्ताव सादर करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके, सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, महेश बनकर, शैलेश वाघमारे यांनी मदत केली.
पुणे ग्रामीण भागात संघटितपणे गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी मोक्कानुसार कारवाई करण्यात येणार आहे. टोळीकडून गैरकृत्य झाल्याचे आढळून आल्यास त्यांच्याविरोधात कडक प्रकारे कारवाई करण्यात येणार आहे.
– डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण



























































