
हमीभावाने मूग खरेदीच्या मान्यतेचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे 31 ऑगस्ट 2020 रोजी पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला केंद्र सरकारची मान्यता मिळाली असून राज्यात 1 ऑक्टोबर 2020 पासून मूग खरेदीला सुरवात होणार आहे. ही खरेदी प्रक्रिया 90 दिवस सुरू राहणार आहे, अशी माहिती पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.
15 सप्टेंबरपासून मूग खरेदीसाठीची नोंदणी सुरु झाली आहे. विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचे 29, मार्केटिंग फेडरेशन 105,महाएफपीसी 47 खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. आतापर्यंत 230 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर नोंदणी करावी, असे आवाहनही पणनमंत्री पाटील यांनी केले. नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना नोंदणीच्या क्रमवारीनुसार मूग खरेदी केंद्रावर आणण्यासाठी एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे. एसएमएस आल्यानंतर ज्या केंद्रावर नोंदणी केली आहे, त्याच केंद्रावर शेतकऱ्यांनी शेतमाल घेऊन यावा. हंगाम 2020- 21 मधील किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत मूग हमीभाव 7 हजार 196 असा जाहीर केला आहे. सर्व खरेदी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे, असेही पाटील यांनी सांगितले.



























































