नेपाळमध्ये १५०० हून अधिक यात्रेकरू अडकले, एकाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । काठमांडू

कैलास मानसरोवर यात्रेवर निघालेले १५००हून अधिक नागरिक मुसळधार पावसामुळे नेपाळमध्ये अडकले आहेत. नेपाळमधील हिंदुस्थानी दूतावासाने या यात्रेकरुंची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार ५२५ यात्रेकरू सिमीकोट, तर हिल्सा येथे ५५० आणि तिबेटच्या मार्गावर ५०० यात्रेकरू अडकले आहेत.

दरम्यान, कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या आंध्र प्रदेशच्या एका नागरिकाचा मृत्यू झाल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. या यात्रेकरुचा मृतदेह हाती लागला असून शवविच्छेदनानंतर त्यांच्या गावी रवाना करण्यात येईल.

हिंदुस्थानी दूतावास सातत्याने नेपालगंज, सिमीकोट आणि हिल्सा या भागातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. मंगळवारी सकाळी अचानक येथील वातावरणात बदल झाला. मुसळधार पाऊस कोसळू लागल्याने विमानसेवाही ठप्प झाली. यापार्श्वभूमीवर हिंदुस्थानी दूतावासाने यात्रेकरू व त्याच्या नातेवाईकांसाठी विविध भाषांमधून हॉटलाईन सेवा सुरू केली आहे. तसेच नेपाळमध्ये नागरि व वैद्यकीय सेवा मुबलक नसल्याने यात्रेकरूंना तिबेटमध्येच थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर नेपाळच्या लष्करी हेलिकॉप्टरच्या मदतीने यात्रेकरूंना सुखरुप बाहेर काढण्याचे प्रयत्न हिंदुस्थानी दूतावासाकडून सुरू आहेत.

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज संपूर्ण परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. तसेच बचाव पथकाला सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.