
एसटी कामगारांच्या संपाची धग गेल्या काही दिवसांत कमी झालेली दिसत असून, जिह्यात महामंडळाचे कर्मचारी कामावर हजर होण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. त्यामुळे जिह्यातील 11 आगारांत आतापर्यंत एक हजारहून अधिक कर्मचारी कामावर रुजू झाले असून, फेऱयांची संख्याही दररोज 500 हून अधिक झाल्याची माहिती महामंडळ प्रशासनाने दिली आहे.
ऐन दिवाळीत एसटी महामंडळाच्या कर्मचाऱयांनी विविध मागण्यांसाठी संप सुरू केला. या संपात सुरुवातीला चालक, वाहकांसह सर्वच प्रशासकीय कर्मचारी सहभागी झाले होते. त्यामुळे सातारा जिह्यातील 11 आगारांतील बस जाग्यावरच उभ्या होत्या. या परिस्थितीमुळे सतत वर्दळ असलेल्या बसस्थानकांमधील वाहतूक ठप्प झाली होती. मागील चार महिन्यांपासून सुरू असलेल्या संपावर तोडगा काढण्यासाठी संपकरी व राज्य शासनाने चार बैठका घेतल्या. यामध्ये कर्मचाऱयांना 41 टक्के पगारवाढ देण्यात आली. मात्र, काही संघटनांनी विलीनीकरणाच्या मुद्दय़ावर ठाम राहात आंदोलन सुरूच ठेवले. आता आंदोलनाचे वारे कमी होत कर्मचारी कामावर हजर होण्याचे प्रमाण वाढले आहे.
दरम्यान, मागील महिनाभरापासून सातारा जिह्यात कर्मचारी कामावर हजर होण्याचे प्रमाण वाढल्याने बस सुरू झाल्या आहेत. यामध्ये शिवशाही बसच्या 69 फेऱया, साध्या गाडय़ांच्या 444 फेऱया अशा दिवसाला एकूण 535 फेऱया सुरू आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात एसटीच्या फेऱया वाढल्याचे दिसून येत आहे. सातारा शहरातील मध्यवर्ती बसस्थानकातून सातारा-पुणे विनाथांबा, सातारा-मुंबई व जिह्यातील इतर आगारांतून बसफेऱया सुरू झाल्या आहेत. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नातदेखील हळूहळू वाढ होत आहे.



























































