
सामना प्रतिनिधी, मुंबई
मुंबईच्या 9 वॉर्डमधील विविध विकास कामांसाठी तब्बल 111 झाडांवर कुऱ्हाड पडणार आहे. यामध्ये तब्बल 87 झाडे तोडण्यात येणार असून 24 झाडे पुनर्रोपित करण्यात येणार आहेत. ही झाडे तोडण्याच्या पार्श्वभूमीवर 28 जानेवारी रोजी भायखळा येथे ट्री ऑथेरिटी कार्यालयात सुनावणी होणार आहे. यावेळी पालिका प्रशासन आणि पर्यावरण यांच्यात खडाजंगी होणार आहे.
रस्ता रुंदीकरण, नवीन रस्ते, पूल अशा अनेक कामांसाठी मुंबईत झाडे तोडण्यासाठी पालिकेची परवानगी आवश्यक होती. मात्र पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणात वनस्पती तज्ञ नसल्याचे सांगत उच्च न्यायालयाकडून झाडे तोडण्यास मंजुरी देण्याचा अधिकार काढून घेण्यात आला आहे. यामुळे आता पालिका प्रशासनाकडून नोटीस प्रसिद्ध करून नागरिकांच्या हरकती-सूचना मागवण्यात येत आहेत. यानुसार प्रसिद्ध करण्यात आलेल्या नोटीसमध्ये 111 झाडे तोडण्यात येणार असल्याचे समोर आले आहे. यामध्ये फोर्ट येथील एक्साइज ऑफिसच्या बांधकामासाठी सर्वाधिक 20 तर 17 झाडे ताडदेव आरटीओ येथील तोडण्यात येणार आहेत.
एकाच महिन्यात शेकडो झाडे तोडली
झोरू भाटेना यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर पालिकेच्या वृक्ष प्राधिकणाकडून झाडे तोडण्यास परवानगी देण्याचे अधिकार काढून घेण्यात आले. यानंतर आयुक्तांना आपल्या अधिकारात 25 झाडे तोडण्याची परवानगी देण्यात आली आहे. यावर पर्यावरणप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात असून पालिका विकासाच्या नावावर झाडांची कत्तल करण्याचा आरोप करण्यात येत आहे. यामध्ये जानेवारीत आतापर्यंत 469 झाडे तोडण्याचे प्रस्तावित आहे.
पुनर्रोपणाच्या नावाखाली कत्तल
विकास कामांसाठी अनेक झाडांचे पुनर्रोपण करण्याची परवानगी संबंधितांकडून मागितली जाते. मात्र प्रत्यक्षात ही झाडे पुनर्रोपित होतच नसल्याचे अनेक ठिकाणी स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पालिकेने पुनर्रोपणावर लक्ष ठेवून कारवाई करण्यासाठी विशेष धोरण तयार करावे अशी मागणी पर्यावरण प्रेमींकडून केली जात आहे.



























































