तरुणीला ठार मारण्याचा प्रयत्न, आई-वडीलांसह भाऊ अटकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वसईमध्ये एका तरुणीचा खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी तरुणीच्या आईवडिलांसह तिच्या भावाला अटक केली आहे. या तरुणीचे एका 18 वर्षांच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. हे प्रेमसंबंध तिच्या घरच्यांना मान्य नव्हते, ज्यामुळे त्यांनी तिला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली आहे.

गोड बोलून फिरायला नेले
वसई पूर्व भागातील वालीव गावामध्ये नवजीवन नाका इथे राहणाऱ्या मधू (18) (बदललेले नाव) हिचे सलील (बदलेले नाव) नावाच्या एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. मधू सलीलसोबत फिरायला गेली होती आणि त्याच वेळी तिला तिच्या भावाच्या मित्राने पाहिले होते. मित्राने हा प्रकार मधूच्या भाऊ रॉकी (बदललेले नाव) याला येऊन सांगितला. त्याने ही बाब त्याचे वडील मधुकर आणि आई सीमा (बदललेली नावे) यांना सांगितला.

मधू घरी आल्यानंतर या तिघांनी तिला त्या मुलासोबत फिरू नकोस,त्याच्याशी असलेले संबंध तोडून टाक असं सांगितलं होतं. मात्र मधू ऐकायला तयार नव्हती. यामुळे या तिघांनी मधूला रविवारी म्हणजेच 1 नोव्हेंबरला गोड बोलून फिरायला नेले. सुरुची बागेत नेल्यानंतर तिघांचा मधूशी परत वाद झाला.

ओढणीने गळा आवळला
दुपारची वेळ असल्याने या बागेत फार वर्दळ नव्हती. तिथे कोणी नसल्याचे पाहून मधू हिला तिच्या घरच्यांनी पुन्हा तोच विषय सुरू करत सलील सोबतचे संबंध तोड असं म्हणत भांडायला सुरुवात केली. हा वाद सुरू असताना मधूचा भाऊ रॉकी याने ‘आमचे नाव खराब करते’ असं म्हणत तिच्या ओढणीने गळा आवळला. करकचून गळा आवळला गेल्याने मधू बेशुद्ध पडली. तिचा मृत्यू झाला असे समजून तिच्या आईवडिलांनी आणि भावाने तिथून पळ काढला.

तरुणीला मुंबईतील रुग्णालयात दाखल केले
काही वेळानंतर मधूला शुद्ध आली. शुद्ध आल्यानंतर हबकलेल्या मधूने रडायला सुरुवात केली. तिचा रडण्याचा आवाज ऐकून स्थानिकांनी धाव घेत तिची विचारपूस केली. त्यांनी पोलिसांनाही तत्काळ याबाबतची माहिती देत बोलावून घेतले. मधूला उपचारासाठी मुंबईच्या रुग्णालयात दाखल केले आहे. तिची प्रकृती स्थिर असून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिच्या आईवडिलांसह भावाला अटक केली आहे.