डिजिटल युगात मुलांचे मानसिक शोषण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>मृणाल घनकुटे

किड इन्फ्लुएंसर्स किंवा किडफ्लुएंसर्स ही लहानग्यांच्या भावविश्वामधील सध्या सर्वात धोक्याची घंटा आहे. 16 वर्षांखालील बच्चेकंपनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळणारी प्रसिद्धी, आर्थिक फायदा यासारख्या प्रलोभनांना सर्रास बळी पडताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, याला त्यांचे पालकही हातभार लावतायत. जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त घेतलेला आढावा. 

 सोशल मीडियाचा अतिरेक

मुलांचे शिकण्याचे, खेळण्याचे आणि बालपण आनंदाने जगण्याचे हेच वय असून ग्लॅमरच्या जगात मिळालेल्या अतिप्रसिद्धीमुळे त्यांच्या बालमनावर अनेक धोकादायक परिणाम होत आहे. सोशल मीडियाचा अतिवापर नकळतपणे मानसिक आरोग्याला धोकादायक परिणाम करतो. यामुळे नैराश्य, चिंता आणि तणाव समस्या मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. तसेच  झोपेची कमतरता (निद्रानाश), मधुमेह, हृदय आणि मेंदूच्या आजारांचा धोकाही वाढतोय.

वोक्हार्ट हॉस्पिटलच्या तज्ञ डॉ. सोनल आनंद सांगतात, ‘सोशल मीडियाच्या वापरामुळे डोपामाइन हार्मोन आपल्या मेंदूत तयार होतो. या संप्रेरकाला ‘फील-गुड केमिकल’ म्हणूनही ओळखले जाते. याचा अर्थ असा की, सोशल मीडिया वापरल्याने तुम्हाला चांगले वाटते, परंतु आपण यामुळे आपल्याजवळच्या व्यक्तीला भेटणे, त्याच्यासोबत जेवणे, गेम खेळणे टाळतो. तरुण मुलांमध्ये सोशल मीडियाचा जास्त वापर इन्स्टाग्रामवर पह्टोज् पोस्ट करण्यासाठी होतो. पोस्ट केल्यानंतर लाईक्स कमी येणे हे नैराश्याचे कारण ठरते.s सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे तरुणांमध्ये अस्वस्थता, नैराश्य यासारखे आजार वाढत आहेत. ही सोशल मीडियाचा अतिवापर करणारी सातवी- आठवीतील मुले सर्वाधिक आरोग्याच्या समस्यांना सामना करत आहेत. या काळात मुलांची अतिशय हायपर वागणूक, आईवर सतत अवलंबून असणं, चिंता अशा तक्रारी आहेत. काहींना आभासी पुनर्वसनाची गरज असते. बालकांमध्ये स्क्रीनचा वापर न केल्यास अस्वस्थता निर्माण होणे, एकाग्रता कमी होणे, चिडचिड होणे, अतिचंचलता, डोळय़ांच्या तक्रारी, लेझी आय, अभ्यासामध्ये अडचणी येणे इत्यादी बाबी दिसून आल्या आहेत.’

सोशल मीडियापासून दूर ठेवत मुलांचे संगोपन कसं करावं? त्यांचा मानसिक विकास कसा करावा? हा प्रश्न हल्लीच्या पालकांना सतावतोय. यावर अपोलो स्पेक्ट्राच्या तज्ञ डॉ. शेफाली वैद्य म्हणाल्या, ‘दहा किंवा त्यापेक्षा कमी वयाची मुले ADHD Disorder च्या समस्येला बळी पडतात. यामध्ये ही लहान मुलं खूप रागावतात आणि स्वभावामध्ये खूप बदल होतात. चिंता आणि नैराश्याला बळी पडतात. अशा परिस्थितीत मुलांना मानसिकदृष्टय़ा सक्षम बनवणे महत्त्वाचे आहे. मुलांना वेळ दिलाच पाहिजे. त्यांच्या आहाराकडे पूर्ण लक्ष द्यावं. त्यांच्याच वयाचं किंवा मूल होऊन मुलांमध्ये रमणं गरजेचं आहे. आपल्या कामातून योग्य वेळ मुलांना दिला तर त्यांची मानसिक, शारीरिक वाढ योग्य होईल.

मुलांच्या मानसिक विकासासाठी तुम्ही त्यांना सामाजिक राहण्यास सांगणे आवश्यक आहे. यासाठी त्यांना त्यांच्या मित्रांसमोर आणि नातेवाईकांसमोर मोकळेपणाने वागायला शिकवा. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वासही वाढेल. अशा प्रकारे ते सामाजिकदृष्टय़ा अधिक सक्षम बनतील आणि सोशल मीडियावरील अवलंबत्व कमी होण्यासही मदत होईल.’ सोशल मीडियाचे बालकांच्या मनावर होणारे हे परिणाम लक्षात घेऊन पालकांनी वेळीच सावध आणि जागृत होणे गरजेचे आहे, अन्यथा ही भावी पिढी सोशल मीडियाच्या गर्तेत ओढली जाण्याचा धोका आणखीनच वाढेल.

ही मुलं नेमपं काय करतात?

सोशल मीडियाच्या माध्यमातून मनोरंजक आणि आकर्षक पोस्ट तयार करून ही मुले मोठय़ा संख्येने दर्शक आणि फॉलोअर्स निर्माण करतात. इन्स्टाग्राम, यूटय़ूब यासारख्या बहुतेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वापरकर्त्यांना त्यांच्या वेबसाइटवर खाती तयार करण्यासाठी 13 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाची आवश्यकता असते. परिणामी, बहुतेक ‘किड फ्लुएंसर्स’ पालक त्यांची ऑनलाइन उपस्थिती टिकवून ठेवण्यासाठी त्यांची खाती चालवीत आहेत आणि पालकच या मुलांना अधिक प्रोत्साहन अथवा बढावा देताना दिसून येत आहे.