महावितरणकडून राज्यात रेकॉर्डब्रेक 23 हजार मेगावॅट विजेचे वितरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आठवडाभरापासून उन्हाचा चटका वाढल्याने एसी, पंखे सुसाट धावू लागले आहेत. तसेच कृषीपंपाचा वीज वापरही मोठय़ा प्रमाणात वाढला असून महावितरणने मंगळवार आणि शुक्रवारी रेकॉर्डब्रेक तब्बल 23 हजार मेगावॅटहून अधिक विजेचे वितरण केले आहे. त्यामुळे आजवरचे सर्वाधिक वीज वितरण करण्याचे सर्व रेकॉर्ड मोडीत निघाले आहेत.

महावितरणकडून मुंबई वगळता राज्यभरात वीज पुरवठा केला जातो. राज्यातील लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्याने याआधी राज्यातून 21-22 हजार मेगावॅट एवढी विजेची मागणी महावितरणकडून नोंदली जात होती. मात्र गेल्या आठवडाभरापासून थंडीचे प्रमाण कमी होऊन उन्हाचा चटका वाढू लागला आहे. त्यामुळे महावितरणने मंगळवारी 23 हजार 75 मेगावॅटचे तर शुक्रवारी 23 हजार 10 मेगावॅट एवढय़ा मोठय़ा प्रमाणात विजेचे वितरण केले आहे. याआधी 9 मार्च 2021 रोजी महावितरणने सर्वाधिक 22 हजार 339 मेगावॅट विक्रमी विजेचा पुरवठा केला होता. विजेची ही मागणी पूर्ण करताना राज्याच्या कोणत्याही भागात विजेचे भारनियमन करण्यात आले नाही. विजेची ही विक्रमी मागणी पूर्ण करण्यासाठी महावितरणने दीर्घकालीन वीजखरेदी करार असलेल्या महानिर्मितीकडून सुमारे 6 हजार 874 मेगावॅट, एनटीपीसी व एनपीसीआयएलकडून एकूण 4 हजार 154 मेगावॅट, खासगी वीज प्रकल्पातून 4 हजार 853 मेगावॅट, अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पातून चार हजार मेगावॅट, तर उर्वरित वीज पॉवर एक्स्चेंजमधून घेतली आहे