
मुंबई महानगरपालिकेच्या 2026 च्या निवडणुकीत मुलुंड प्रभाग क्र. 108 मधून निवडून आलेल्या भाजपच्या नगरसेविका दीपिका वाईरकर-घाग यांच्या जात पडताळणी प्रमाणपत्रावर शिवसेनेच्या उमेदवार शुभांगी केणी यांनी आक्षेप घेत जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, सिंधुदुर्ग यांच्याकडे तक्रार केली आहे. या प्रकरणाबाबत 8 जून रोजी जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, ओरोस, सिंधुदुर्ग येथे सुनावणी होणार आहे. दीपिका वाईरकर-घाग यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यास त्यांचे नगरसेवकपद धोक्यात येऊ शकते.
पालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार शुभांगी केणी या 10 हजार 205 मिळवून दुसऱया क्रमांकावर राहिल्या, तर भाजपच्या उमेदवार दीपिका वाईरकर-घाग विजयी झाल्या. मात्र या निवडणुकीत दीपिका वाईरकर-घाग यांनी निवडणुकीसाठी सादर केलेले भंडारी (ओबीसी) जात प्रमाणपत्र संशयास्पद असल्याचा आरोप शिवसेनेच्या शुभांगी केणी यांनी केला आहे. हे जात पडताळणी प्रमाणपत्र कणकवली उपविभागीय कार्यालयातून 18 नोव्हेंबर 2010 रोजी जारी करण्यात आले आहे.
असा आहे घोळ
दीपिका वाईरकर-घाग यांना ओबीसी भंडारी असे जात प्रमाणपत्र देताना संबंधित प्रशासनाने कागदपत्रांची योग्य आणि कायदेशीर पडताळणी केली नाही. शिवाय प्रमाणपत्र वितरणातही कायदेशीर बाबींचे उल्लंघन झाल्याचा आरोपही शुभांगी केणी यांनी केला आहे.
दीपिका वाईरकर-घाग यांच्या शाळेच्या दाखल्यावर ‘हिंदू मराठा’ असा स्पष्ट उल्लेख आहे, मात्र त्यांनी ओबीसी प्रवर्गातून निवडणूक लढवली आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केणी यांनी केली आहे.
दीपिका वाईरकर-घाग यांच्या वडिलांच्या शाळेच्या दाखल्याबाबतही संशय असल्याचे केणी यांनी म्हटले आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांनीच केणी यांच्या दाखल्यात तफावत असल्याचे जात पडताळणी समितीला सांगितले आहे. यामुळे या प्रकरणाची चौकशी दक्षता समितीकडून करावी अशी मागणी केणी यांनी केली आहे.



























































