मुंबईतील 212 आरोग्य केंद्रांवर आठवडय़ात एकदा मुलांचे लसीकरण, पालिका विशेष कॅम्प सुरू करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुलांच्या लसीकरणाला गती देण्यासाठी पालिकेच्या मुंबईभरातील 212 आरोग्य केंद्रांवर आठवडय़ातून एक दिवस मुलांच्या लसीकरणासाठी विशेष कॅम्प सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय शाळांच्या मागणीनुसारही लाभार्थी मुले उपलब्ध असल्यास लसीकरण केले जाईल, अशी माहिती पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.

मुंबईत मार्च 2020 मध्ये कोरोनाने शिरकाव झाल्यानंतर सुमारे वर्षभराने 16 जानेवारी 2021 पासून लसीकरणाला सुरुवात झाली. सद्यस्थितीत सुमारे 150 पालिका, खासगी आणि सरकारी लसीकरण केंद्रांवर व्हॅक्सिनेशन सुरू आहे. आतापर्यंत 18 वर्षांवरील सर्व 92 लाख 36 हजार 500 पात्र लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. तर आरोग्य कर्मचारी, प्रंटलाइन वर्कर्स आणि 60 वर्षांवरील ज्येष्ठांना पालिकेच्या माध्यमातून ‘प्रिकॉशन डोस’ही देण्यात येत आहे. तर इतर लाभार्थ्यांना खासगी रुग्णालयात ‘प्रिकॉशन डोस’ घेता येत आहे. मात्र मुलांच्या लसीकरणाला आवश्यक त्या प्रमाणात प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे पालिकेच्या माध्यमातून विविध उपायोजना करण्यात येत आहेत. यामध्ये सोसायटय़ा, झोपडपट्ट्या, खासगी शाळांमध्ये पालिकेच्या माध्यमातून लसीकरण कॅम्प आयोजित केले जात आहेत.

असे झाले लसीकरण (झालेले लसीकरण)

18 वर्षांवरील – 92 लाख 36 हजार 500 – या वयोगटात 112 टक्के जणांचा पहिला डोस तर 101 जणांचा दुसरा डोस पूर्ण. यामध्ये 22 टक्के लाभार्थ्यांनी ’प्रिकॉशन डोस’ही घेतला आहे.
15 ते 17 वर्षे वयोगट – 6 लाख 12 हजार 461 – या वयोगटात 58 टक्के जणांचा पहिला डोस तर 46 टक्के जणांचा दुसरा डोस पूर्ण.
12 ते 14 वर्षे वयोगट – 3 लाख 95 हजार 882 – या वयोगटात 37 टक्के जणांचा पहिला तर 20 टक्के जणांचा दुसरा डोस पूर्ण.

6 ते 12 वयोगटाला परवानगीची प्रतीक्षा

6 ते 12 वयोगटाच्या मुलांच्या लसीकरणासाठी केंद्राकडून पालिकेला परवानगीचे पत्र मिळाले नसल्याने या वयोगटाचे व्हॅक्सिनेशन सुरू झालेले नाही. दरम्यान, कोरोनापासून सर्वेत्तम उपाय असणारे लसीकरण पात्र लाभार्थ्यांनी प्राधान्याने लवकरात लवकर करून घ्यावे असे आवाहन पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.