सूर मारणारा तरुण स्विमिंग पूलमध्ये पोहणाऱ्या वृद्धावर आदळला, आजोबांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जलतरण तलावात तरुणाची उडी अंगावर पडल्याने एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना गोरेगाव पश्चिम येथे घडली आहे. विष्णू सामंत (75) असं या वृद्धाचं नाव आहे. या प्रकरणी गोरेगाव पोलिसांनी 20 वर्षांच्या तरुणावर निष्काळजीपणा केल्याने वृद्धाच्या मृत्युला कारणीभूत झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

सामंत हे त्यांच्या पत्नीसह गोरेगाव पूर्व येथे राहतात. गेल्या महिन्याभरापासून आपला नातू नील (14) याच्यासोबत ते गोरेगावच्या सिद्धार्थ नगर येथील ओझोन पूलवर सायंकाळी पाच ते सहा या वेळेत पोहायला जात होते. 23 एप्रिल रोजी ते दोघंही नेहमीप्रमाणे पूलवर गेले होते. काही वेळाने नील यांचा फोन सामंत यांच्या पत्नीला आला. आजोबा अत्यवस्थ असून त्यांना रुग्णालयात नेत असल्याचं त्याने सांगितलं.

एका 20 वर्षांच्या तरुणाने सूर मारत पूलमध्ये उडी टाकली. पण तो नेमका पूलमध्ये असणाऱ्या सामंत यांच्या अंगावर पडला. त्यामुळे सामंत यांना डोक्याला आणि मानेला दुखापत झाली. पूलच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलं. मात्र, तिथे सामंत यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी 20 वर्षांच्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.