
वाढत्या कोरोनाला रोखण्यासाठी आता खबरदारी, नियमांची कठोर अंमलबजावणी आणि लसीकरणावर भर देण्याचे उद्दिष्टय़ ठेऊन पालिकेने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये कोरोना होऊच नये यासाठी लसीकरणाचा वेग वाढवण्यात येणार आहे. यासाठी लवकरच घरोघरी लस देण्यात येणार आहे. यासाठी पालिकेने केंद्राकडे प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
मुंबईत सद्यस्थितीत दररोज सुमारे 40 ते 45 हजारांपर्यंत कोरोना लसीकरण होत आहे. लसीकरणाची संख्या दिवसाला एक लाखापर्यंत वाढवण्यासाठी कार्यवाही करण्यात येणार असल्याचे पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी नुकतेच जाहीर केले आहे. यासाठी पालिकेच्या माध्यमातून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. यामध्ये घराजवळ कोविड लसीकरणाची सोय उपलब्ध करून देण्याची परवानगी मिळावी यासाठी पालिकेने केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर निवासी संकुलांमध्ये लसीकरणाची सोय उपलब्ध होणार आहे. पालिकेने लाभार्थ्यांना कोविन ऍपवर नोंदणी न करता लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शिवाय नगरसेवक आणि सामाजिक संस्थांची मदत घेऊन लसीकरणाचा वेग वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान, निवासी संकुलात लसीकरणाची व्यवस्था करण्यासाठी आवश्यक वैद्यकीय व्यवस्था तैनात ठेवाव्या लागणार आहेत. त्यामुळे या परवानगी केंद्राकडून परवानगी मिळाल्यानंतर आवश्यक त्या सर्व सुविधा करून असे लसीकरण सुरू करता येईल, असे काकाणी यांनी सांगितले.
दोन शिफ्टमध्ये लस देणार
पालिका आगामी काळात दोन पाळ्यांमध्ये लसीकरण करणार आहे. यामध्ये सकाळी 7 ते दुपारी 2 आणि दुपारी 2 ते रात्री 9 वाजेपर्यंत लस देण्यात येईल. यासाठी आवश्यक यंत्रणा आणि डोस उपलब्ध होतील. दोन शिफ्टमध्ये लसीकरण करण्यासाठी सुरुवातीला 15 सेंटर सुरू करण्यात येतील. सद्यस्थितीत तीन टप्प्यांतील सुमारे 25 लाखांच्या टार्गेटपैकी 40 टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे.
31 मेपर्यंत 45 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण
पालिकेने आणखी 29 खासगी रुग्णालयांना लसीकरणाची परवानगी मिळावी म्हणून केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला आहे. यातील 9 खासगी रुग्णालयांना परवानगी देण्यात आल्याने सद्यस्थिती 100 ठिकाणी लसीकरण होत आहे. सद्यस्थितीत 3 लाखांवर डोस उपलब्ध असून नियोजनाप्रमाणे लसीकरण सुरू आहे. 31 मेपर्यंत 45 वर्षांकरील सर्वांना लस देण्याचीही तयारी आहे. हे सुमारे 40 लाख नागरिक असतील.

































































