
नाशिक ऑक्सिजन प्लाण्ट दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, मुंबईतील पालिकेच्या जम्बो कोरोना सेंटर्स, पालिका रुग्णालयांमधील प्लाण्टवर दोन प्रशिक्षित गॅस ऑपरेटर्स, अभियंते कामाचे नियोजन करत असून प्लाण्टमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यास त्यामुळे कोणत्याही रुग्णाच्या जीवाला धोका पोहोचू नये, यासाठी बॅकअप प्लाण्ट आणि डय़ुरा ऑक्सिजन सिलिंडर्सचा साठा सज्ज ठेवण्यात आला आहे. प्लाण्टच्या सुरक्षेसाठी 10 मीटरच्या परिसरात प्रवेशबंदी करण्यात येणार असून खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षारक्षक नेमण्यात येणार आहेत, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.
नाशिक येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात बुधवारी ऑक्सिजन टँक (प्लाण्ट)ची गळती होऊन व्हेंटिलेटर्सवर असलेल्या 22 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर, महापौर किशोरी पेडणेकर यांनी महानगरपालिकेच्या सेव्हन हिल्समध्ये तर आज वरळी येथील एनएससीआय जम्बो कोरोना सेंटरमधील ऑक्सिजन प्लाण्टला भेट देऊन आढावा घेतला. महापौर म्हणाल्या, अशा प्रकारच्या कुठल्याही दुर्घटनेत रुग्णांचा नाहक बळी जाऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून सर्व कोरोना रुग्णालयांतील मेडिकल ऑक्सिजन प्लाण्टची पाहणी केली जात असून प्लाण्टची सुरक्षा व खबरदारी याला प्रथम प्राधान्य दिले जात आहे. मेडिकल ऑक्सिजन घेऊन येणाऱया गाडीचा प्रशिक्षित वाहनचालक हा सर्वप्रथम या प्लाण्टची तपासणी करून नंतरच ऑक्सिजन भरला जातो, अशी माहिती महापौरांनी दिली.
दरम्यान, मुंबईची गरज लक्षात घेता येत्या काही दिवसांत मुंबईत 12 ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यात येणार असून लहान कोरोना सेंटर्स आणि रुग्णालयांसाठी डय़ुरा ऑक्सिजन सिलिंडर्स सज्ज ठेवण्यात आली आहेत. त्याचबरोबर वापरून संपलेली 1 हजार सिलिंडर्सही रिफिल करण्यात येणार आहेत. यावेळी नगरसेविका हेमांगी वरळीकर, सान्वी तांडेल, नॅशनल स्पोर्ट क्लब ऑफ इंडिया येथील जम्बो कोरोना सेंटरचे अधिष्ठाता डॉ. हर्षवर्धन टिकले, बीकेसी जम्बो कोरोना सेंटरचे अधिष्ठाता डॉ. राजेश डेरे उपस्थित होते.
असा आहे पालिकेचा बॅकअप प्लाण्ट
मेडिकल ऑक्सिजन प्लाण्टवर काही अडचण निर्माण झाल्यास दोन्हीही ठिकाणी बॅकअप प्लाण्ट व डय़ुरा ऑक्सिजन सिलिंडर्स तयार ठेवण्यात आली आहेत.
व़रळी येथील मेडिकल ऑक्सिजन प्लाण्टची क्षमता ही सहा ते सात हजार लिटर आहे, तर वांद्रे येथील मेडिकल ऑक्सिजन प्लाण्टची क्षमता ही 60 हजार लिटरची आहे. त्यासोबतच वांद्रे येथे 80 सिलिंडर्स बॅकअप म्हणून ठेवण्यात आली आहेत.
दोन्हीही ठिकाणी मुख्य प्लाण्टमध्ये काही बिघाड झाल्यास 80 सिलिंडर्समुळे दोन दिवस ऑक्सिजन पुरवता येणार आहे.



























































