
बेकायदेशीर कॉल सेंटर थाटून अमेरिकन नागरिकांना चुना लावणाऱया दहा जणांचा गोरखधंदा अंधेरी व एमआयडीसी पोलिसांनी उद्ध्वस्त केला आहे. शुक्रवारी रात्री उशिरा अंधेरी पूर्वेकडे सुरू असलेल्या या बोगस कॉल सेंटरवर छापा मारून पोलिसांनी धडक कारवाई केली.
अंधेरी-कुर्ला मार्गावर मोटा नगरच्या समोर असलेल्या मेहता इस्टेटच्या दुसऱया मजल्यावर बोगस कॉल सेंटर सुरू असून तेथील काही इसम हे अमेरिकन नागरिकांची फसवणूक करीत असल्याची खबर अंधेरी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार अपर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सूचनेनुसार उपायुक्त महेश्वर रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ निरीक्षक विजय बेळगे व एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जगदीश शिंदे आणि पथकाने मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी मध्यरात्री मेहता इस्टेटमध्ये सुरू असलेल्या बोगस कॉल सेंटरवर छापा मारला. त्यावेळी तेथे 95 पुरुष व 20 महिला काम करीत असताना आढळून आल्या.
या बोगस कॉल सेंटरमधून आयबीएम डायलरमार्फत अमेरिकन नागरिकांना संपर्क साधून त्यांचे अॅमेझॉनचे खाते हॅक झाले आहे. कोणीतरी सदर खात्याच्या माध्यमातून वस्तू खरेदी करत आहेत व त्याचे पैसे तुम्हाला भरावे लागतील, अशी भीती दाखवून त्यांना अॅमेझॉन, वॉलमार्ट, नायकी, टारगेट, गुगल प्ले व इतर कंपन्यांचे गिफ्टकार्ड खरेदी करावयास सांगून त्यांचे कोड नंबर मागवून मग कार्ड्स स्वरूपात पैसे घेतले जात होते. अशा प्रकारे हे भामटे अंधेरीत बसून परदेशी नागरिकांची फसवणूक करीत असल्याचे चौकशीतून समोर आले. ब्रॉडमाइंड्स आयटी सोल्युशन प्रा. लि. नावाने कॉल सेंटर सुरू होते, मात्र कॉल सेंटर चालविण्यासा आवश्यक असलेली कोणतीही कागदपत्रे पोलिसांना तेथे मिळाली नाहीत. हे बोगस कॉल सेंटर चालविणाऱया दहा जणांना अटक करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.





























































