
मध्य रेल्वेने ट्रेनच्या जुन्या बोगीचा वापर रेस्टॉरंटसाठी करीत सीएसएमटी आणि नागपूर येथे ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ची यशस्वी उभारणी केल्यानंतर आता दादर, कुर्ला (लोकमान्य टिळक टर्मिनस), कल्याण, नेरळ, माथेरान, इगतपुरी आणि लोणावळा येथेही रेल्वे थीम आधारित रेस्टॉरंटची उभारणी केली जाणार आहे.
मध्य रेल्वेने पॅटरिंग पॉलिसीअंतर्गत नवनव्या संकल्पना राबवून उत्पन्न मिळविण्याचे धोरण सुरूच ठेवले आहे. त्यानुसार मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे नुकतेच ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ तयार केले. हे रेस्टॉरंट जुन्या रेल्वे कोचचा कल्पक वापर करून बनवण्यात आले आहे. सीएसएमटीच्या लांब पल्ल्यांच्या गाडय़ा सुटणाऱ्या प्लॅटफॉर्म क्रमांक 18 च्या समोर हे रेस्टॉरंट उभारले आहे. ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ मध्ये 10 टेबलसह 40 व्यक्तींना बसण्याची सोय आहे. या रेस्टॉरंटच्या आतील भाग रेल्वेच्या थीमनुसार सजवले आहे. सीएसएमटीच्या रेस्टॉरंटला 1 लाख 25 हजार खवय्या प्रवाशांनी भेट देत आस्वाद घेतला आहे, तर नागपूरच्या रेस्टॉरंटला 1 लाख 50 हजार खवय्यांनी भेट देत आस्वाद घेतला आहे.
मुंबईबाहेरही ‘सेवा
मुंबईच्या जवळील कुर्ला, दादर, कल्याण, नेरळ, माथेरान, इगतपुरी आणि लोणावळासह मुंबईच्या बाहेर आकुर्डी, चिंचवड, मिरज आणि बारामती रेल्वे स्थानकावरही ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ सेवा सुरू करण्याची योजना असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले.




























































