Mumbai crime news – सुरक्षा रक्षकाच्या हत्येप्रकरणी एकाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पूर्वीच्या वादातून सुरक्षा रक्षकाची डोक्यात पेव्हर ब्लॉक घालून हत्या करणाऱ्याला अखेर क्राईम ब्रँच युनिट-9 ने अटक केली. जयशंकर मिश्रा असे त्याचे नाव आहे. मिश्राच्या अटकेसाठी युनिट 9 च्या पथकाने दोन दिवस किंग्ज सर्कल परिसरात फिल्डिंग लावली होती.

मृत राजेश कुमार हा मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी होता. तो सांताक्रुझ पश्चिम येथे सुरक्षा रक्षकाचे काम करायचा. काही महिन्यांपूर्वी जयशंकर आणि राजेशकुमारमध्ये वाद झाला होता. बुधवारी रात्री जयशंकर आणि राजेशकुमारमध्ये वाद झाला. वाद झाल्यावर त्या दोघांमध्ये झटापट झाली होती. त्यानंतर जयशंकर हा घरी गेला. पहाटे पुन्हा तो घटनास्थळी आला. त्याने राजेशकुमारला लाकडी दंडुक्याने, सिमेंट पेव्हर ब्लॉक आणि छत्री डोक्यात मारून जखमी केले. मारहाणीत राजेशकुमार हा जखमी झाला. मारहाणीचा प्रकार एका सुरक्षा रक्षकाच्या लक्षात आला. त्याने याची माहिती सांताक्रुझ पोलिसांना दिली. पोलिसांनी राजेशकुमारला मृत घोषित केले. राजेशकुमारच्या हत्येप्रकरणी मिश्राविरोधात गुन्हा नोंद केला.

या गुह्याचा समांतर तपास युनिट 9 करत होते. सहाय्यक आयुक्त महेश देसाई यांनी अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या. प्रभारी पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या पथकातील अधिकाऱ्याने तपास सुरू केला. पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. हत्येनंतर मिश्रा हा वडाळा, किंग्ज सर्कल, वांद्रे, दादर, कुर्ला, अंधेरी आणि मालाड येथे गेल्याचे दिसले. तो किंग्ज सर्कल रेल्वे स्थानकात उतरत असल्याचे एका फुटेजमध्ये दिसले. तोच धागा पकडून पोलिसांनी तपास पुढे नेला. पोलिसांनी दोन दिवस किंग्ज सर्कल रेल्वे स्थानकात फिल्डिंग लावली. शनिवारी मिश्रा हा किंग्ज सर्कल येथे आला. पोलिसांनी मिश्राला ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यावर त्याने हत्येची कबुली दिली. मिश्राला पुढील कारवाईसाठी सांताक्रुझ पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याला आज न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावली आहे.