वैद्यकीय पदवी नसताना क्लिनिक थाटून डॉक्टरकी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुठलीही वैद्यकीय पदवी नसताना गुप्तरोगासंबंधित विविध आजारांवर अॅलोपॅथी, आयुर्वेदिक व युनानी औषधोपचार करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याबरोबर त्यांच्याकडून भरमसाट फी उकळणाऱ्या 10 बोगस डॉक्टरांवर मुंबई गुन्हे शाखेने कारवाई केली. याप्रकरणी भांडुप पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.

मुंबईत काही मुन्नाभाई क्लिनिक थाटून गुप्तरोगासंबंधित विविध आजारांवर उपचार करत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार युनिट-7 घ्या पथकाने वैद्यकीय अधिकाऱयांसमवेत विविध ठिकाणी कारवाई केली. ‘संतोष हेल्थ क्लिनिक’ (भांडुप), ‘विनायक हेल्थ क्लिनिक’ (भांडुप), ‘हमदम दवाखाना’ (जोगेश्वरी), ‘कोहिनूर दवाखाना’ (जोगेश्वरी), ‘अंकुश आयुर्वेदिक दवाखाना’ (बोरिवली), दीपक हर्बल हेल्थ केअर क्लिनिक( दहिसर), ‘समर आयुर्वेदिक दवाखाना’ (मानखुर्द) या सात क्लिनिकमध्ये छापा टाकून तेथे प्रॅक्टिस करीत असलेल्या 10 बोगस डॉक्टरांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडे वैद्यकीय क्षेत्रातील वैध पदवी नसताना किंवा महाराष्ट्र मेडिकलमध्ये नोंदणी नसताना डॉक्टर असल्याचे भासवून बेकायदेशीररीत्या विविध आजारावरील रुग्णांवर औषधोपचार करत होते.

वैधता संपलेल्या औषधांची विक्री

तसेच काही क्लिनिकमध्ये बोगस डॉक्टर वैधता संपलेले युनानी व आयुर्वेदिक औषधे विक्री करीत असताना मिळून आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. सदर कारवाईत त्यांच्या ताब्यातून साधारण रुपये दोन लाख 20 हजार किमतीचे वेगवेगळ्या प्रकारचे औषधी बॉटल्स, सीरिंज, अॅण्टीबायोटिक टॅबलेट्स असे वेगवेगळ्या प्रकारची औषधे व वैद्यकीय साहित्य जप्त करण्यात आले.