गाडीच्या डिकीत आणि बोनेटमध्ये लपवायचे गांजा, बदलापुरातून 28 किलो गांजा जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाकोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) ने बदलापुरात कारवाई करून 28 किलो गांजा जप्त केला आहे. एनसीबी आणि पोलिसांना चकवा देण्यासाठी तस्कराने गाडीच्या बोनेट आणि डिकीत विशिष्ट प्रकारचे होल करून त्यात तो गांजा लपवला होता. गांजा तस्करी करणाऱया जयभारत राठोडला एनसीबीने अटक केली असून त्याचा पळून गेलेला साथीदार सुनील भंडारीचा एनसीबी शोध घेत आहे.

एनसीबीने मुंबई, ठाणे, बदलापूर परिसरात सतत कारवाई करून ड्रग्ज तस्कराचे कंबरडे मोडले आहे. गेल्याच आठवडय़ात एनसीबीने बदलापूर येथे कारवाई करून 43 किलो गांजा जप्त केला होता. गांजा तस्करी करणाऱया सनी परदेशी आणि अजय नायरला एनसीबीने ताब्यात घेऊन चौकशी केली होती. त्याच्या चौकशीनंतर बदलापूर येथे एका वाहनातून गांजाची तस्करी होणार असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. त्या माहितीनंतर एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या पथकाने कारवाई करून एका टोयोटो वाहनाला थांबवले. त्या वाहनांची तपासणी केली असता त्यातून 14 पाकीट गांजाची जप्त केली होती. लॉकडाऊन काळात एनसीबी आणि पोलिसांना चकवा देण्यासाठी गाडीच्या बोनेट आणि डिकीत विशिष्ट जागा करून त्यात तो गांजा लपवला होता. गांजा तस्करी करणाऱया जयभारतला एनसीबीने ताब्यात घेतले असून रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आली. त्याचा साथीदार सुनील हा पळून गेला आहे. सुनील हा गेल्या पाच-सहा वर्षांपासून ड्रग्जची तस्करी करत असल्याचे एनसीबीचे म्हणणे आहे. तो गांजा ओडिशामार्गे बदलापूरला आणायचा. त्यानंतर तो गांजा पेडलरला पुडय़ा करून विकायचे.