‘शिवशाही’मध्ये दिव्यांगांना सवलत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मुंबई

एसटी महामंडळाने सुरू केलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या शिवशाही (आसनी) बसेसमध्ये दिव्यांगांना आणि त्याच्या सोबतच्या प्रवाशाला तिकिटात सवलत देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.

13.05.1985च्या निर्णयानुसार राज्यातील अंध/दिव्यांग व्यक्तींना तसेच त्यांच्या साथीदारांना एसटी महामंडळाच्या साध्या बसेसमध्ये अनुक्रमे 75 टक्के व 50 टक्के सवलत देण्यात येते. 26.11.2008च्या निर्णयानुसार साध्या बसेसमधून देण्यात येणारी ही सवलत निमआराम बसेसमध्येसुद्धा लागू करण्यात आली आहे. त्याप्रमाणे अंध/दिव्यांग व्यक्तींकडून तसेच त्यांचे साथीदार यांच्याकडून प्रवासात अनुक्रमे 25 टक्के तसेच 50 टक्के रक्कम वसूल करण्यात येते व उर्वरित अनुक्रमे 75 टक्के व 50 टक्के रकमेची प्रतिपूर्ती सरकारकडून करण्यात येत असते. त्यामुळे 12.10.2018च्या निर्णयानुसार 65 टक्के किंवा अधिक अपंगत्व असलेल्या लाभार्थ्यांच्या साथीदारासही प्रवास भाडय़ात 50 टक्के सवलत जारी करण्यात आली आहे.

शिवशाही बसेसमध्ये आतापर्यंत अंध/दिव्यांगानाही प्रवासी भाडय़ातील सवलत नसल्यामुळे अंध/दिव्यांगांना तसेच त्यांच्या सोबत मदतनीस म्हणून प्रवास करणाऱयांना शिवशाही (आसनी) अनुक्रमे 70 टक्के आणि 45 टक्के सवलत जारी करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. ही सवलत 6 व 7 मार्च 2019च्या मध्यरात्रीपासून लागू करण्यात आली आहे. 7 मार्चपूर्वी ज्या दिव्यांगांनी शिवशाही (आसनी) तिकिटे आरक्षित केली असतील त्यांना परतावाही मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.