
गेल्या 15 वर्षाहून अधिक काळ रखडलेला पूर्वीचा मुंबई-गोवा महामार्ग व आताचा पनवेल कन्याकुमारी या महामार्गाला जणू ग्रहण लागल्याची स्थिती आहे. गेली अनेक वर्षे लोकार्पणाच्या प्रतीक्षेत असलेल्या या महामार्गाची सतत तोडफोड करून डागडुजी करावी लागत आहे. एकीकडे अपूर्ण काम आणि दुसरीकडे खराब होत चाललेला रस्ता यामुळे प्रवासी व वाहन चालक पुरते कंटाळले आहेत. लोकार्पणापूर्वी या महामार्गाची सतत खोदाई सुरू आहे.
पनवेल ते कन्याकुमारी हा 1640 किमी लांबीचा रस्ता अद्याप पूर्ण झालेला नसून समस्यांनी ग्रासला आहे. पनवेलहून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, कर्नाटक, केरळ अशा महत्त्वाच्या ठिकाणाहून तामीळनाडूतील कन्याकुमारीत संपतो. केंद्र शासनाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला सध्या ग्रहण लागलेले पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी उड्डाणपुलांची कामे, रस्त्याची कामे अपूर्ण आहेत हा भाग वेगळा. पण पूर्ण कामदेखील पुन्हा खोदाई करून पुन्हा काँक्रिटीकरण करावे लागत असल्याने रस्ता बांधकामाच्या दर्जावरच प्रश्न उपस्थित होत आहे.
सावर्डे येथे सह्याद्री शिक्षण संस्थेनजीक रस्ता खचला होता. भेगा पडल्या होत्या. अनेकदा मलमपट्टी करण्यात आली. परंतु अखेर काँक्रीट फोडून पुन्हा काँक्रिटीकरण करण्याची वेळ आली असून, सध्या काम सुरू आहे. जनतेची फसवणूक होत असलेल्या या कामाची चौकशी व्हावी अशी मागणी देखील केली जात आहे. संगमेश्वर ते चिपळूण भागात रस्त्यावर असंख्य ठिकाणी खड्डे पडले आहेत.
गणेशोत्सवापूर्वी संगमेश्वर येथील रखडलेले काम पूर्ण होईल असे सांगितले होते. परंतु आश्वासने पूर्ण न झाल्याने नाराजीचा सूर उमटत आहे.
चिपळूणच्या उड्डाणपुलावरून या वर्षी तरी वाहने जातील असे वाटले होते. परंतु चिपळूणकरांचा भ्रमनिरास झाला आहे.
चिपळूण ते संगमेश्वर दरम्यान अनेक ठिकाणी पडलेले खड्डे, भेगा बुजवण्यात याव्यात अशी मागणी होत आहे. अनेक ठिकाणी पाणी साचत आहे. याकडेही संबंधित विभाग दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे.































































