
मुंबईत गोवरमुळे बालक दगावण्याची मालिका सुरू असून आज सलग चौथ्या दिवशी अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या बालकाचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत गोवरमुळे दगावणाऱया मुलांची संख्या 13 वर पोहोचली असून दोन बालके अत्यवस्थ आहेत. मुंबईत गोवरचे आज 19 रुग्ण सापडले असून एकूण रुग्णसंख्या 152 वर पोहोचली आहे तर संशयित रुग्णांची संख्या 3 हजार 695 वर पोहोचली आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेने आतापर्यंत 46 लाख 3 हजार 388 घरांचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे.
गोवंडीत राहणाऱया 8 महिन्याच्या बालकाचा आज मृत्यू झाला. त्याचे गोवर लसीकरण झाले होते. ताप आणि पुरळ उठल्यानंतर त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्यामुळे त्याला रविवारी पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारीही त्याच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्यामुळे त्याला पालिकेच्या विशेष रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती खालावत जाऊन आज दुपारी 1 च्या सुमाराला सर्व अवयव निकामी होऊन त्याचे निधन झाले.
वरळीतील शाळांमध्ये गोवरची मोफत तपासणी, लसीकरण करा
मुंबईतील गोवरच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर वरळीतील शाळांमध्ये गोवरची मोफत तपासणी आणि लसीकरण करा, अशी मागणी युवासेनेच्या वतीने महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे करण्यात आली आहे. मुंबईत गेल्या दोन महिन्यांपासून गोवरची साथ असून रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गोवर संसर्गजन्य असल्यामुळे दाटीवाटीच्या जागा, चाळी, झोपडपट्टय़ांमध्ये महापालिकेच्या वतीने मोफत तपासणी आणि लसीकरण सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर वरळीतील शाळा-शाळांमध्ये मोफत तपासणी आणि लसीकरण केले जावे, अशी मागणी युवासेना वरळी विधानसभेचे विभाग अधिकारी संकेत सावंत यांनी केली आहे.
पूर्व उपनगरात जास्त रुग्ण
मुंबईत 11 विभागांत गोवरचा संसर्ग झाला असून आज सापडलेल्या 19 रुग्णांपैकी पूर्व उपगरातील वॉर्डमध्ये सर्वात जास्त रुग्ण सापडले आहेत. सी वॉर्डमध्ये 1, डीमध्ये 1, ईमध्ये 2 तर जी दक्षिण विभागात 2 रुग्ण तर पे पश्चिममध्ये 2 तर पी दक्षिणमध्ये एक रुग्ण सापडला.
तातडीने लस घ्या
मुंबई महापालिकेच्या वतीने पालिका दवाखाने, प्रसूतिगृहे आणि रुग्णालयांमध्ये 9 महिने ते 5 वर्षे वयोगटातील मुलांना मोफत लस दिली जात आहे. गोवरची लस दिली नसल्यास ती तातडीने घ्या, असे आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आले आहे. दरम्यान, नियमित लसीकरणाबरोबर अतिरिक्त लसीकरण मोहीम वेगाने सुरू असून ताप आणि पुरळ असलेल्या रुग्णांना ‘अ’ जीवनसत्त्वच्या दोन मात्रा 24 तासांच्या अंतराने दिल्या जात आहेत.

































































