सोसायटीतील घाण साफ करणाऱ्या अध्यक्ष, सचिवाला हायकोर्टाचा दिलासा; कारवाई न करण्याचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इमारतीजवळील घाण साफ करणाऱ्या कांदिवली येथील गृहनिर्माण सोसायटीचे अध्यक्ष व सचिव यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. त्यांच्यावर तिवरांची कत्तल केल्याचा आरोप आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी कोणतीही कारवाई करू नये, असे अंतरिम आदेश न्यायालयाने दिले आहेत.

कांदिवली येथील पूजा सिंग व डॉ. शांताराम कारंडे यांनी ऍड. विनोद सांगवीकर यांच्यामार्फत ही याचिका केली आहे. त्यांच्याविरोधात विशाल सुभाष गायकवाड यांनी चारकोप पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्याची दखल घेत पोलिसांनी या दोघांविरोधात पर्यावरण संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. हा गुन्हा रद्द करावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. न्या. अजय गडकरी व न्या. शाम चांडक यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. वरील आदेश देऊन न्यायालयाने ही याचिका अंतिम सुनावणीसाठी दाखल करून घेतली आहे.

पोलिसांचा दावा

तिवरांची कत्तलीसाठी न्यायालयाची परवानगी लागते. परवानगी न घेताच तिवरांची कत्तल केल्यास गुन्हा नोंदवावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना दिले आहेत. त्यामुळेच हा गुन्हा नोंदवल्याचा असा दावा पोलिसांनी न्यायालयात केला. त्यावर न्यायालय संतापले. मुंबईत अनेक ठिकाणी तिवरांची कत्तल करुन त्यावर झोपडय़ा उभ्या राहिल्या आहेत, इमारतींचे बांधकाम झाले आहे. अशा किती सोसायटय़ांवर तुम्ही गुन्हा नोंदवलात? असे खडेबोल न्यायालयाने पोलिसांना सुनावले. साफसाफईनंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यानी येथील जागेची पाहणी केली. तिवरांचे काहीच नुकसान झालेले नाही, असे वन विभागाने स्पष्ट केल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण

चारकोपला वेस्ट व्हिव हाऊसिंग सोसायटी आहे. सिंग या सोसायटीच्या अध्यक्षा आहेत व कारंडे हे सचिव आहेत. या सोसायटीजवळील मोकळ्या जागेत तिवर आहेत. तेथे कचरा टाकला जातो. शौचालयासाठी त्या जागेचा वापर केला जातो. त्याचा त्रास सोसायटीला होत होता. ही घाण साफ करण्यासाठी सोसायटीने पालिकेकडे अर्ज केला. ही जागा आमच्या हद्दीत येत नाही, असे उत्तर पालिकेने दिले. अखेर सोसायटीने घाण साफ करण्याचा निर्णय घेतला. येथील तिवरांचे नुकसान न करता घाण साफ केली. तरीही पोलिसांनी गुन्हा नोंदवला. हा गुन्हा रद्द करावा, अशी मागणी याचिकेत केली आहे.