मुंबईतील सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट होणार, वाढत्या आगीच्या घटनांमुळे पालिकेचा निर्णय 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील वाढत्या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, सर्व खासगी, पालिका, सरकारी रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे आदेश मुंबई महापालिकेने आज जारी केले. मुंबई अग्निशमन दल फायर ऑडिट करणार असून त्याबाबतचा अहवाल 15 दिवसांत पालिकेला सादर करण्यात येणार आहे.

भांडुपमध्ये ड्रिम्स मॉलमध्ये आग लागून सनराइज रुग्णालयातील 9 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. या भीषण दुर्घटनेत रुग्णालयातील अग्निसुरक्षेत त्रुटी आढळल्या होत्या. त्यावरून रुग्णालयांतील अग्निसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. पालिकेच्या स्थायी समिती बैठकीतही या आगीवरुन सदस्यांनी पालिका प्रशासनावर जोरदार टीका केली होती. पालिका प्रशासनाने याची गंभीर दखल घेत शहरातील सर्वच रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिकेने अग्निशमन दलाला फायर ऑडिट करण्याचे आदेश दिले असून यात पालिका रुग्णालयांसह खासगी आणि सरकारी रुग्णालयांचाही समावेश आहे. त्रुटी आढळणाऱया रुग्णालयांवर कारवाई केली जाणार आहे.

अग्निशमन दलप्रमुख कोरोना पॉझिटिव्ह

अग्निशमन दलाचे प्रमुख अग्निशमन अधिकारी कैलास हिवराळे यांना कोरोना झाला आहे. त्यांना सौम्य लक्षणे असून त्यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भांडूप येथील ड्रीम्स मॉलला 26 मार्चला लागलेल्या आगीवेळी हिवराळे यांनी आघाडीवर राहून काम केले होते. यानंतर तीन दिवसांनी हिवराळे कोरोना पॉझिटिव्ह ठरले आहेत. हिवराळे प्रभादेवी येथे लागलेल्या आगीवेळीही घटनास्थळी उपस्थित होते.