
पश्चिम रेल्वे मार्गावर मागील पाच महिन्यांत तब्बल 6721 घुसखोर प्रवाशांना ‘लेडीज स्पेशल’ लोकलमधून अटक करण्यात आली. महिला डबा आणि विशेष लोकलमधील घुसखोरांच्या वाढत्या संख्येने महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
चर्चगेट ते विरार आणि डहाणू स्थानकांदरम्यान सद्यस्थितीत एकूण 10 ‘लेडीज स्पेशल’ लोकल चालवल्या जात आहेत. या लोकलच्या सामान डब्यात मोठय़ा प्रमाणावर पुरुष प्रवासी घुसतात. सकाळी व सायंकाळच्या ‘पीक अवर्स’ला महिलांच्या हक्काच्या जागेवर पुरुष प्रवासी अतिक्रमण करतात. यासंदर्भातील वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वे प्रशासनाने कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. त्याअंतर्गत पाच महिन्यांत 6721 घुसखोर प्रवाशांना ‘लेडीज स्पेशल’ लोकलमधून बाहेर काढून त्यांना अटक करण्यात आली. अशा घुसखोर प्रवाशांकडून 14 लाख रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती रेल्वे अधिकाऱयांनी दिली.
रात्री कारवाई अधिक तीव्र करण्याची मागणी
‘लेडीज स्पेशल’ लोकल ट्रेनच्या सामान डब्यात आम्हाला अजिबात प्रवेश करता येत नाही. गर्दीच्या वेळी अनेक महिला या डब्यातून प्रवास करू शकतात. मात्र घुसखोर पुरुष प्रवाशांमुळे आमच्या हक्काच्या जागेवर गदा येते, अशी प्रतिक्रिया कांदिवली येथील प्रवासी महिला संचिता भिंगार्डे यांनी दिली.
‘लेडीज स्पेशल’ लोकलमध्ये घुसखोरी करणाऱया प्रवाशांना रोखण्याचा प्रयत्न लोकलचे गार्ड तसेच आरपीएफ व जीआरपीचे जवान करतात. मात्र घुसखोर प्रवासी त्यांच्याशीच हुज्जत घालतात, असे काही महिला प्रवाशांनी सांगितले.



























































