पावसाळ्यात वसई, विरार बुडणार; नालेसफाई लटकली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महापालिकेने दरवर्षीप्रमाणे यंदाही नालेसफाईसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले, पण अनेक ठिकाणी ही नालेसफाई लटकली असून पैसे पाण्यात जाण्याची चिन्हे आहेत. अजूनही नाल्यांमधील गाळ, प्लास्टिक, कचरा, झाडांच्या फांद्या व अन्य वस्तू दिसत असून यंदाच्या पावसाळ्यात नाल्यांचे पाणी शहरात शिरून वसई, विरार बुडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

वसई, विरार शहरात अनेक नाले असून यावर्षीच्या अर्थसंकल्पातून १८ कोटी रुपयांची तरतूद साफसफाईसाठी करण्यात आली. अधिकारी, महापौर तसेच विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी नालेसफाईचे दौरेदेखील केले. पण सफाईचे हे काम पूर्णपणे झालेले नाही. याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख प्रथ्मेश राऊत यांनी नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यास त्यास महापालिका प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा दिला आहे.

येथे साचते पाणी

दरवर्षी जुलै महिन्यात वसई-विरार पट्ट्यात मुसळधार पाऊस पडताच सखल भागात पाणी साचून रस्ते जलमय होतात. नालासोपारा पूर्व गालानगर, सेंटर पार्क, विरार पश्चिम बोलिंज रोड, ग्लोबल सिटी, विरारनगर, यशवंतनगर, पूर्वेकडील मनवेलपाडा आणि वसईतील मधुबन, देवतलाव, सन्सिटी आदी सखल भागात पाणी तुंबल्यामुळे अनेकदा जनजीवन विस्कळीत होते आणि रहिवाशांची मोठी गैरसोय होते. यंदाही तेथे पाणी साचण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.