
रेल्वे प्रशासनाने विनातिकीट प्रवासाचा किमान दंड 250 रुपयांवरून थेट 500 रुपये केला. हा वाढीव दंड सध्या लोकल प्रवासात ‘कळी’चा मुद्दा ठरला आहे. वाढीव दंड आकारणी सुरू केल्यापासून प्रवाशांकडून तिकीट तपासनीसांशी (टीसी) वाद घालण्याचे प्रमाण वाढले आहेत. लागोपाठ येणाऱया एसी लोकलमध्ये सामान्य लोकलचे प्रवाशी शिरतात. त्यांच्यावर कारवाई करताना बाचाबाची आणि वादाचे प्रकार घडत असल्याचे मध्य रेल्वेवरील काही टीसींनी सांगितले.
उपनगरी रेल्वे मार्गावर एसी लोकलच्या फेऱयांमध्ये गेल्या काही महिन्यांत मोठी वाढ झाली आहे. साध्या लोकलच्या फेऱया रद्द करून त्याजागी एसी लोकल फेऱया चालवल्या जात आहेत. त्यामुळे सामान्य प्रवाशांची गैरसोय होत असतानाच विनातिकीट, अवैध प्रवासाचा दंड दुप्पट करण्यात आला आहे. अनेकदा लागोपाठ एसी लोकल सोडल्या जातात. त्यात साध्या लोकलचे तिकीट काढणाऱया प्रवाशांची रखडपट्टी होते. त्यापैकी अनेक प्रवाशी एसी लोकलमध्ये शिरतात आणि टीसीच्या तावडीत सापडतात.
अशा वेळी कारवाई करताना टीसींशी वाद घालण्याचे प्रमाण वाढले आहे. एकीकडे साध्या लोकलच्या कमी फेऱया आणि दुसरीकडे वाढीव दंड या कात्रीत प्रवाशी अडकत आहेत. साध्या लोकलच्या तिकिटावर एसी लोकलमध्ये चढणाऱया प्रवाशांकडून वाढीव दंडाची पावती फाडली जाते. यादरम्यान अनेक प्रवाशी रेल्वे प्रशासनावर संताप व्यक्त करीत वाढीव दंड भरण्यास टाळाटाळ करतात. यातून वादाचे प्रकार वाढले असून टीसींना धक्काबुक्की वा हल्ले होण्याची भीती व्यक्त होत आहे. उपनगरी मार्गावर गाडय़ांचे वेळापत्रक आणि प्रवाशी सेवेचे योग्य नियोजन नसल्यामुळे वाढीव दंडाचा विषय सध्या टीसी व प्रवाशांमध्ये वादाचे कारण ठरल्याचे प्रवाशी संघटनांचे म्हणणे आहे.
मध्य रेल्वेवर टीसी आणि प्रवाशांमध्ये रोज वाद होत आहेत. वाढीव दंड वसुली टीसींसाठी आव्हानात्मक काम बनले आहे. वादाच्या वाढत्या प्रकारांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने टीसी आणि आरपीएफचे मनुष्यबळ वाढवणे आवश्यक आहे. प्रवाशांनी वैध तिकीट काढूनच प्रवास करावा.
संजीवकुमार दुबे, सीआरएमएस पदाधिकारी
रेल्वेने महसूलवाढीसाठी टीसींचे मनुष्यबळ वाढवले पाहिजे होते. तसे न करता दुप्पट दंड आकारून महसुलाचे टार्गेट पूर्ण करण्याचे पाऊल टाकले. लोकल ट्रेनमधून 70 ते 80 टक्के सामान्य लोक प्रवास करतात. वाढीव दंड वसुली ही गरिबांच्या मानेवर सुरी ठेवून महसूल वाढवण्याचा प्रकार आहे. त्यातूनच प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक होतोय.
मधु कोटीयन, अध्यक्ष, मुंबई रेल प्रवाशी संघ



























































