
घाटकोपर येथील अशोक नगरमध्ये बुधवारी गौशिया चाळीवर दरड कोसळून आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेत डोंगर, टेकडय़ांवर राहणाऱया नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबईत तब्बल 249 धोकादायक दरडींच्या ठिकाणी वस्ती आहे. सर्वाधिक ठिकाणे कुर्ल्यापासून मुलुंड पश्चिमेपर्यंतच्या भागातील आहेत. दरड प्रवण क्षेत्रात संरक्षक भिंतींचे काम पूर्ण झाले आहे. काही ठिकाणी या कामांचे टेंडरही निघालेले नाही. संरक्षक भिंतींचे काम तत्काळ सुरू करावे, यासाठी पालिका प्रशासनाने म्हाडा आणि संबंधित यंत्रणांशी पत्रव्यवहार सुरू केला आहे.
दरडींमुळे धोकादायक असलेल्या भागातील सर्वाधिक जमिनीची मालकी जिल्हाधिकारी, वन विभाग, महसूल विभाग आणि म्हाडासारख्या आस्थापनांची आहे. त्यामुळे तिथे संरक्षक भिंती बांधण्याचे काम थेट पालिका करत नाही. दरड कोसळून होणाऱया दुर्घटना टाळण्यासाठी पालिकेतर्फे पाहणी करून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला जातो. पालिकेने केलेल्या सर्वेक्षणानुसार, प्रामुख्याने भांडुप येथे 116 ठिकाणी, घाटकोपर 32 तर कुर्ला येथे 17 ठिकाणी तर ग्रँट रोड येथे 15 ठिकाणी दरडींचा धोका आहे. बुधवारच्या घाटकोपर दुर्घटनेनंतर ज्या ठिकाणी संरक्षक भिंती उभ्या राहिलेल्या नाहीत, ते काम पूर्ण करण्यासाठी पालिकेने पुन्हा हालचाली सुरू केल्या आहे. पालिकेने म्हाडा, पीडब्ल्यूडी व अन्य संबंधितांना रिमाइंडर पाठवायाला सुरुवात केली आहे.
- एन विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी जून 2026 मध्ये म्हाडाला पत्र दिलेले आहे. आता कालच्या घटनेनंतर पुन्हा एकदा संबंधित यंत्रणांना स्मरणपत्र पाठवण्यात आले आहे.
- एल वॉर्डात 13 ठिकाणी दरडींचा धोका आहे. या ठिकाणी सर्वेक्षण करून संरक्षक भिंती बांधल्या जाणार आहेत. नऊ मीटरपेक्षा कमी उंचीच्या संरक्षक भिंती म्हाडा तर त्यावरील उंचीच्या भिंती पीडब्ल्यूडी बांधणार आहे.
अनेक ठिकाणी संरक्षक भिंत नाहीत
एन वॉर्डातील घाटकोपर पश्चिम येथील ओंकारेश्वर मित्र मंडळ, सिद्धेश्वर मित्र मंडळ, रामनगर, विक्रोळी पार्कसाईट, शिव गर्जना सोसायटी 2, राहुल नगर, विक्रोळी पार्कसाईट गजानन आणि सुदर्शन सोसायटी, वर्षा नगर या दरड प्रवण क्षेत्रात संरक्षक भिंत उभारण्याच्या कामाची टेंडर प्रक्रिया सुरू झाली आहे. तर जय श्रीराम सोसायटी रामनगर, विक्रोळी येथे संरक्षक भिंतीचे काम सुरू झाले आहे.






























































