
>> वैष्णवी कानविंदे-पिंगे
एखादं लोणचं ताजं असताना ते छान लागतं. पण जसं मुरतं तसं ते आणखी लज्जतदार होतं आणि ते जितकं जुनं तितकं अधिक टेस्टी! ‘मुंबई पुणे मुंबई 3’ हा सिनेमादेखील असाच आहे. पहिल्या सिनेमापासून प्रेक्षकांच्या अभिरुचीला पुरक ठरणारा ‘मुंबई पुणे मुंबई’ने दुसर्या भागात प्रेक्षकांशी जिव्हाळ्याचं नातं जोडलं आणि आता तिसर्या भागात या गौरी गौतमच्या जोडीने आणि त्यांच्या अख्ख्या कुटुंबाने प्रेक्षकांशी नाळ आणखी घट्ट केली आहे…मुंबई पुण्याचं मिळून घातलेलं हे मुरलेलं लोणचं प्रेक्षकांच्या चवीला नककीच सुखावेल हे नक्की.
‘मुंबई पुणे मुंबई’ या पहिल्या सिनेमामध्ये गौरी आणि गौतम यांची प्रेम कहाणी दिसली. ते सांगताना मुंबई आणि पुणे या शहरांची तिथल्या माणसांची जातकुळी या सिनेमातनं दाखवली गेली. हलकी फुलकी प्रेम कहाणी लोकांना मनापासून आवडली होती. दुसर्या भागात लग्न जमताना मुलीच्या मनाची घालमेल. आजच्या मुलीचं मन आणि नव्या पिढीच्या मुलांची विचारसरणी हा जवळ जवळ प्रत्येक घरातला प्रवाह या सिनेमाने आंबट गोड चवीची पेरणी करत छान टिपला होता आणि आता या तिसर्या भागात मूल होण्याची चाहूल लागली की आजच्या पिढीच्या आई-बाबांची होणारी मानसिक घालमेल. करियर, मनाची तयारी, आपलं आयुष्य, स्वातंत्र्य या बाबींमुळे नव्याची जबाबदारी घेण्यास कच खाणारं मन असं सगळं या सिनेमाने इतकं अलगद आणि छान टिपलंय की बघता बघता ती मधुर चव सिनेमा संपला तरी आपल्या मनात रेंगाळत राहाते.
या सिनेमाची पटकथा अगदी फक्कड. प्रत्येक क्षण अगदी छान जातो आणि जराही कंटाळ्याची भावना येत नाही. पहिल्या दृश्यापासनं ते अगदी शेवटच्या दृश्यापर्यंत हा सिनेमा पेक्षकांवर आपली घट्ट पकड ठेवतो आणि अगदी आपल्याच घरातली घटना वाटावी असा निखळ आनंद हा सिनेमा पाहताना वाटतो. या पटकथेवर चढलेला खुसखुशीत संवादांचा साजही मस्तच. या सिनेमात काही गंभीर क्षणही आहेत. कुठे इमोशनल प्रसंगही आहेत. पण उगाच पाल्हाळ लावत सिनेमा जराही खेचला नाहीय. अभिनय ही या सिनेमाची आणखी एक जमेची बाजू. संगीताचे सगळे सूर जुळून आले की ज्या पद्धतीने ते रंगत अगदी तसंच यातल्या कलाकारांच्या अभिनय जुगलबंदीबद्दल म्हणावं लागेल. स्वप्निलने पकडलेला गौतमचा सलग सूर. त्याला मुक्ताच्या संयत, पण कमालीच्या सहज अभिनयाची साथ. प्रशांत दामलेचा अतिशय सहज सुंदर निखळ अभिनय म्हणजे तर मेजवानीच आणि या सगळ्याला बाकी सगळ्या कलाकारांची उत्तम साथ लाभली आहे.
या सिनेमाचं संगीत, छायांकन, कपडेपट, स्टायलिंग या सगळ्या गोष्टीही खूप छान जमून आल्या आहेत. या सगळ्यामुळेच सिनेमा खूप आपल्या घरातला आणि आपलासा वाटतो. मुळात या मधला विषय जो आहे तो अगदी घरगुती आणि आपल्या आजूबाजूच्या अनेक मराठी घरात घडणारा आहे. त्यामुळे तो पाहताना वेगळं काही असं जाणवतच नाही आणि मुख्य म्हणजे या एकूण तिन्ही सिनेमांनी मिळून अगदी अलगद एक गोफ गुंफलाय. पहिल्या भागात मुंबई पुण्याचा टोकेरीपणा या तिसर्या सिनेमात दिसत असूनही एकमेकांमध्ये बेमालूम मिसळल्यासारखा वाटतो.
पहिला अर्धा भाग तर उत्तमच जमून आलाय. प्रत्येक घरात काहीतरी खटके असतात. दोन पिढ्यांमधले काही मतांतरं असतात. पण तरीही ही सगळी कपातली वादळं कपातच शांत होतात. कुठेही फिल्मीपणा न करता अगदी घरगुती पद्धतीने केलेले चित्रण आणि त्याला दिलेली हलक्या फुलक्या विनोदी प्रसंगाची अगदी सहज जोड हे या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. जरी तुमच्या आमच्यातला विषय असला तरी तो सिनेमारूपाने उतरवायला आणि प्रेक्षकांना त्यात गुंतवायला अधिक सुक्ष्म अभ्यास लागतो आणि तो अभ्यास लेखक दिग्दर्शक सतीश राजवाडेंनी अगदी बारकाईने केलाय हे सिनेमाचं रसग्रहण करताना प्रत्येक टप्प्यावर जाणवतं. हा सिनेमा कदाचित लांबीमध्ये थोडा कमी असता तर बरं झालं असतं. पण त्यामुळे विशेष फरक पडत नाही. एकूणच सिनेमा संपतो तेव्हा मनात आनंद घेऊन आपण बाहेर पडतो आणि हेच या सिनेमाचं यश आहे. म्हणूनच आनंदाचे काही क्षण कमवण्यासाठी मुंबई-पुण्याचा हा तिसरा प्रवास प्रत्येक चाहत्याने केलाच पाहिजे.
दर्जा : *** 1/2
सिनेमा : ‘मुंबई पुणे मुंबई 3’
निर्माता : संजय छाब्रिया
दिग्दर्शक : सतीश राजवाडे
लेखक : सतीश राजवाडे
संवाद : आश्विनी शेंडे
संगीत : अविनाश विश्वजीत
कलाकार : स्वप्निल जोशी, मुक्ता बर्वे, प्रशांत दामले, सुहास जोशी,
सविता प्रभुणे, मंगल केंकरे, विजय केंकरे



























































