
मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून 500 मिमी पाऊस पडूनही जनजीवन सुरळीत आहे. पाणी तुंबणारी ठिकाणे कमी झाली आहेत. शिवाय हवामान खात्याने जोरदार पावसाचा इशारा दिला असल्यामुळे पालिकेची संपूर्ण यंत्रणा ‘अलर्ट मोड’वर असून आपत्कालीन कक्षातून मुंबईभरातील तब्बल 5 हजार 397 ठिकाणांवर ‘सीसीटीव्ही’च्या माध्यमातून पालिकेची नजर असल्याची माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिकेच्या आपत्कालीन कक्षाला दिलेल्या भेटीप्रसंगी आयुक्तांनी ही माहिती दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनीही पालिकेची आपत्कालीन यंत्रणा आणि पावसाळापूर्व कामांचे कौतुक केले.
संपूर्ण जून महिना दडी मारलेल्या पावसाने गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत जोरदार बरसायला सुरुवात केली आहे. गेल्या तीन दिवसांत अनुक्रमे 215 मिमी, 115 मिमी आणि 160 मिमीहून जास्त पाऊस झाला. मात्र मुंबईतील जनजीवन सुरळीत सुरू आहे, असे आयुक्त यावेळी म्हणाले. वडाळा, ऍण्टॉप हिलसारख्या भागात साचलेले दिसणारे पाणी पंपांच्या सहाय्याने उपसण्यास योग्य झाल्यानंतर निचरा केल्याचे ते म्हणाले. यावेळी आयुक्तांनी पावसाळापूर्व कामे आणि आपत्कालीन स्थितीचा सामना करण्यासाठी पालिकेकडून तैनात करण्यात आलेल्या व्यवस्थेची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली. यावेळी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अतिरिक्त मुख्य सचिव आशीष कुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, मदत व पुनर्वसन सचिव असीमकुमार गुप्ता, पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त आशीष शर्मा, डॉ. संजीव कुमार, पी. वेलरासू, आपत्कालीन कक्ष संचालक महेश नार्वेकर, प्रमुख अधिकारी संगीता लोखंडे आदी अधिकारी उपस्थित होते.
हिंदमाताजवळ पाणी साचले नाही
वर्षानुवर्षे पाणी तुंबण्याची समस्या असणारा हिंदमाता परिसरात या वर्षी पाणी साचले नाही. या ठिकाणी भूमिगत टाक्यांचा प्रयोग करण्यात आला आहे. यामध्ये सेंट झेवियर्स मैदान आणि प्रमोद महाजन उद्यान येथे अतिवृष्टीचे पाणी साठवण्यासाठी टाक्या बांधण्यात आल्या आहेत. पाऊस कमी झाल्यानंतर साठवलेल्या पाण्याचा निचरा करण्यात येतो. त्यामुळे हिंदमाता आता पूरमुक्त झाले आहे. शिवाय गांधी मार्केटमध्येही उपाययोजना केल्यामुळे हा परिसरही पूरमुक्त झाला आहे.
रुळांवर पाणी तुंबणाऱया 25 ठिकाणी ‘बेस्ट’, ‘एसटी’ सेवा
मुंबईची लाइफलाइन असलेल्या रेल्वे मार्गावर 25 ठिकाणी पालिकेची ‘बेस्ट’ सुविधा, ‘एसटी’ची सुविधा देण्याचे निर्देश पालिका आयुक्त आणि मुख्य सचिवांना दिल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. जेणेकरून या नागरिकांना निवाऱयांमध्ये राहण्याची गरज लागणार नसून ते आपल्या घरी जाऊ शकतील, असेही ते म्हणाले.
राज्यात चार हजार नागरिकांचे स्थलांतर
राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. रत्नागिरी, रायगडला ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. त्यामुळे धोकादायक ठरणाऱया ठिकाणांवरील साडेतीन ते चार हजार रहिवाशांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मुंबई, रायगड, रत्नागिरीसह संवेदनशील ठिकाणी ‘एनडीआरएफ’च्या तुकडय़ा तैनात करण्यात आल्या आहेत. पूरस्थितीच्या भागात पालक सचिकांना जाण्याचेही निर्देश देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
पालिकेने चांगले काम केलेय- मुख्यमंत्री
पालिकेची नालेसफाई, पावसाळय़ातील खड्डे आणि पाणी तुंबण्यावरून पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारले असता त्यांनी पाणी तुंबणाऱ्या 200 ठिकाणांमधील बहुतांशी ठिकाणे कमी झाल्याचे सांगितले. पालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेली कामे, नालेसफाई योग्यप्रकारे झाल्यामुळेच पाणी तुंबले नाही, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. पावसाळय़ात पडणारे खड्डे भरपावसातही बुजवता येतील यासाठी आवश्यक त्या प्रमाणात कोल्डमिक्सचे वितरण वॉर्डमध्ये करण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुंबईत दर्जेदार रस्त्यासाठी आगामी काळात जास्तीत जास्त रोड सिमेंट-काँक्रीटचे करण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. अतिधोकादायक इमारतींत राहणाऱ्या रहिवाशांनी सुरक्षित स्थळी जाऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.





























































