मुंबईकर लय भारी…! ‘फर्स्ट क्लास’ विश्वविक्रम, 92 वर्षांचा विक्रम मोडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रणजी करंडकावर 41 वेळा आपले नाव कोरणाऱया बलाढय़ मुंबई क्रिकेट संघाने आज बंगळुरूच्या अलुरू येथे खेळवण्यात आलेल्या रणजी उपांत्यपूर्व लढतीत उत्तराखंड संघाला तब्बल 725 धावांनी पराभूत केले. मुंबईचा हा महाविजय रणजीतीलच नव्हे तर प्रथम श्रेणी क्रिकेटमधील विक्रमी ऐतिहासिक विजय ठरला आहे. मुंबईने ऑस्ट्रेलियातील स्थानिक लीगमधील  685 धावांच्या विजयाचा 92 वर्षांच्या विक्रम आज मोडीत काढला. ऑस्ट्रेलियात 1930 मध्ये  न्यू साऊथ वेल्स संघाने क्वीन्सलँड संघाला 685 धावांनी पराभूत करीत प्रथम श्रेणीतील मोठय़ा विजयाचा विश्वविक्रम रचला होता. चॅम्पियन मुंबईने तो मोडत रेकॉर्ड बुकात आपल्या नावाची सुवर्णाक्षरांनी नोंद केली आणि दिमाखात यंदाच्या रणजी उपांत्य फेरीत मजल मारली. कसोटीच्या इतिहासात इंग्लंडनेही 1928-29 च्या मोसमात ‘अॅशेस’ लढतीत ऑस्ट्रेलियाला 675 धावांनी पराभूत करण्याचा पराक्रम केला होता.

मुंबई संघाने चौथ्या दिवशी उत्तराखंड संघाला विजयासाठी 795 धावांचे अशक्यप्राय आव्हान दिले होते. पण नवख्या उत्तराखंड संघाचा दुसरा डाव मुंबईकर गोलंदाजांनी  69 धावांतच उखडला. मुंबईच्या वतीने धवल कुलकर्णी 11 धावांत 3 विकेट, शम्स मुलानी 15 धावांत 3 विकेट आणि तनुष कोटीयन 13 धावांत 3 विकेट यांनी उत्तराखंडच्या फलंदाजांना दुसऱया डावात खेळपट्टीवर फार काळ उभेच राहू दिले नाही. 27.5 षटकांतच मुंबईने प्रतिस्पर्धी संघाचा डाव झटपट गुंडाळला. रणजी पदार्पणातच द्विशतकी खेळी साकारणारा मुंबईचा सुवेद पारकर याला या लढतीतील ‘मॅन ऑफ दि मॅच’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मुंबईकरांचे 1 द्विशतक, 2 शतके आणि 4 अर्धशतके

बंगळुरूतील रणजी उपांत्यपूर्व लढतीवर चारही दिवस मुंबईचेच प्राबल्य होते. मुंबईच्या फलंदाजांनी लढतीच्या दोन्ही डावांत मिळून 1 द्विशतक, 2 शतके आणि 4 अर्धशतके साकारून खोऱयाने धावा लुटल्या. सुवेद पारकरने जायबंदी अजिंक्य रहाणेच्या बदल्यात मिळालेल्या संधीचे सोने करीत 447 चेंडूंत 252 धावांची द्विशतकी खेळी साकारली. त्यानंतर धडाकेबाज सर्फराज खान (205 चेंडूंत 153) तर दुसऱया डावात मुंबईकडून यशस्वी जैसवाल (150 चेंडूंत 103) या दोघांनी शतके झळकावली. मुंबईच्या अर्धशतकवीरांत कर्णधार पृथ्वी शॉ (72), अरमान जाफर (60), शम्स मुलानी (59) आणि यष्टिरक्षक आदित्य तरे (57) या चौघांचा समावेश आहे.

संक्षिप्त धावसंख्या

मुंबई ः पहिला डाव 166.4 षटकांत 8 बाद 647 (घोषित) आणि दुसरा डाव ; 58 षटकांत 3 बाद 261 (घोषित)

उत्तराखंड ः पहिला डाव – 41.1 षटकांत सर्वबाद 114  आणि दुसरा डाव -27.5 षटकांत सर्वबाद 69

हिंदुस्थानातील प्रथम श्रेणी सुपरविजय

  • डिसेंबर 1953 रणजीत बंगालचा ओडिशावर 540 धावांनी विजय
  • दक्षिण विभागाचा 2011 मध्ये दुलीप करंडक लढतीत मध्य विभागावर 552 धावांनी विजय