मुंबईकरांची दाणादाण, गेल्या 24 तासात पडला 26 वर्षातला सप्टेंबरमधील विक्रमी पाऊस

मंगळवारी दुपारी सुरू झालेला पावसाने सलग 12 तास तुफान बॅटींग करत मुंबईकरांची झोप उडवली. रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईतील सखल भागात पाणी भरले होते. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याने पुन्हा एकदा मुंबईकर हवालदील झालेला दिसला.

दरम्यान गेल्या 12 तासात मुंबईत कोसळलेला पाऊस हा विक्रमी पाऊस होता. सप्टेंबर महिन्यात 24 तासात पडलेला हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक पाऊस आहे. याआधी 26 वर्षांपूर्वी म्हणजेच 1974 ला सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक पाऊस पडला होता. मंगळवारी सकाळी 8.30 ते बुधवारी सकाळी 8.30 पर्यंत सांताक्रुझ वेधशाळेने 286.4 मिलीमीटर पावसाची नोंद केली आहे. तर कुलाबा वेधशाळेने 157.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पुढच्या 24 तासात देखील वेधशाळेने मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

मंगळवारी दुपारपासून मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड परिसरात पावसाला सुरुवात झाली होती. रिपरिप पडणाऱ्या पावसाने संध्याकाळ होईपर्यंत जोर धरला होता. रात्री विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. गेले तीन दिवस मुंबईकरांना सुर्याचे दर्शन झालेले नाही. बुधवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास दिवस मावळतीच्या वेळी जेवढा उजेड असतो तेवढा अंधूक उजेड होता. गुरुवारीही असाच पाऊस कायम राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान खात्याने  मुंबई शहर , उपनगरे , ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. हा भागात बुधवारी आणि गुरुवारी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ऑरेंज अॅलर्ट जारी केला आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या