
सामना प्रतिनिधी । मुंबई
1857 च्या स्वातंत्र्ययुद्धात शहीद झालेल्यांच्या स्मरणार्थ मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर उभारण्यात आलेले स्मृतिस्मारक अक्षरशः धूळ खात पडले आहे. मेट्रोच्या कामासाठी या स्मृतिस्मारकाच्या चोहोबाजूने पत्रे उभारण्यात आले आहेत. मेट्रोच्या कामामुळे या स्मृतिस्मारकावर रोज प्रचंड धूळ बसत आहे. स्मारकाच्या आजूबाजूलाही साफसफाई नाही, परंतु मेट्रो रेल्वे प्रशासन याकडे साफ दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. अशा प्रकारे मेट्रो प्रशासनाकडून या शहीद स्मारकाचा रोज अवमान होत आहे.
जिथे मेट्रोचा प्रकल्प सुरू आहे तेथे साफसफाई ठेवण्याची जबाबदारी मेट्रो रेल्वे प्रशासनाची असून त्याबाबतचा करारही करण्यात आला होता, मात्र मेट्रो हा करार विसरल्याचेच चित्र येथे आहे. स्वातंत्र्ययुद्ध स्मृतिस्मारकाच्या परिसरात जिकडेतिकडे रोज पालापाचोळा पडलेला दिसतो. हा पालापाचोळा साफ करण्याची तसदीही मेट्रो प्रशासनाकडून घेतली जात नसल्याबद्दल मुंबईकरांकडून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. 1857 च्या स्वातंत्र्ययुद्धात हिंदुस्थानींनी आपल्या प्राणांची आहुती दिली. या शहीदांप्रति देशवासीयांच्या भावना तीव्र आहेत. या भावनांचाच जणू मेट्रोने अवमान केल्याची प्रतिक्रिया मुंबईकरांमधून उमटत आहे. मुंबईत मेट्रोचे जाळे पसरले आहे. रस्तोरस्ती मेट्रोने जागा अडवून पत्रे टाकलेले आहेत. त्यामुळे रस्त्यावर प्रचंड धूळ असते. ही धूळ मेट्रो प्रशासन रोजच्या रोज साफ करते, पण शहीद स्मारकाकडे मात्र मेट्रोने साफ दुर्लक्ष केले आहे.



























































