सिरी रोडची पायवाट पायवाटच राहू द्या! गाड्यांचा रस्ता करू नका!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बाबुलनाथ मंदिराच्या मागील बाजूने कमला नेहरू पार्ककडे जाणारी पायवाट वृक्षराजीने नटलेली आहे. या पायवाटेने गिरगाव चौपाटीकडून थेट कमला नेहरू पार्कपर्यंत येथील नागरिक सकाळ-संध्याकाळ फेरफटका मारतात. मात्र हा निसर्गरम्य पदपथ म्हणजेच सिरी रोड गाडय़ांसाठी रस्ता करण्याचा घाट घातला जात आहे. याविरोधात 2015 साली स्थानिक नागरिकांनी आंदोलन करून येथील निसर्ग वाचवल्यानंतर आता पुन्हा एकदा हा रस्ता करण्याचे प्रयत्न सुरू झाल्याने मलबार हिलमधील नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. हा रस्ता होऊ देऊ नका अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

मलबार हिलमधील रहिवाशांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सिरी रोडसंदर्भात पत्र लिहिले आहे. या पत्रात सिरी रोडचा हा रस्ता नागरिकांच्या फिरण्यासाठी पायवाटच राहू द्यावी. याचा रस्ता बनवून तिथे गाडय़ांना प्रवेश देऊ नये, अशी मागणी केली आहे. मलबार हिलमधील रहिवासी प्रकाश मुन्शी यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठपुरावा केला आहे. सिरी रोड भाग हा खऱया अर्थाने ग्रीन झोन आहे. पण एका विकासकाने बॉम्बे गॅरेज आणि त्या परिसरातील मालमत्ता खरेदी केल्याने तिथे पोहोचण्यासाठी सिरी रोडच्या पायवाटेचा रस्ता केला जात आहे असा आरोप मलबार हिलमधील नागरिकांनी केला आहे. कमला नेहरू पार्कमधील लहान मुलांचे खेळण्याचे उद्यानही उद्ध्वस्त होईल. मात्र विकासकासाठीच हा घाट घातला जात असून आम्ही याला तीव्र विरोध करणार असल्याचे मलबार हिलमधील महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा सुसी शहा यांनी सांगितले. मलबार हिल रहिवासी कार्यकर्त्या इंद्राणी मल्कानी यांनीही या रस्त्याला तीव्र विरोध केला असून प्रसंगी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

पर्यावरण मंत्र्यांनाही पत्र

नेपियन सी सिटिझन फोरमनेही पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे. कमला नेहरू पार्ककडे जाणारा जो पदपथ आहे त्याचे सौंदर्यीकरण करा. त्याचप्रमाणे येथे पक्का रस्ता करण्याचा पुढे आलेला प्रस्ताव रद्द करा अशी मागणी या फोरमने पर्यावरणमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

150 झाडांची कत्तल होईल

सिरी रोडमधील झाडे वाचविण्यासाठी आम्ही 2015 साली आंदोलन केले होते तेव्हा संबंधित विकासकाने माझ्यावर केस टाकली. तेव्हा विद्यार्थीही त्या आंदोलनात सहभागी झाले होते. केम्प्स कॉर्नर परिसरात दरड कोसळल्याचे कारण देत हा पर्यायी रस्ता होईल असे सांगितले जात आहे. मात्र प्रत्यक्षात याचा काहीही संबंध नाही. उलट रस्ता झाल्यास येथील 150 हून अधिक झाडांची कत्तल होईल आणि इथला निसर्ग नष्ट होईल. हे रोखण्यासाठी आम्ही तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा येथील गगनगिरी महाराज सेवा ट्रस्टचे विश्वस्त संजय शिर्के यांनी दिला आहे.