
मुंबईत घर भाडय़ाने द्यायचे असेल किंवा खरेदी-विक्री करायचे असेल तर स्टॅम्प डय़ुटी भरून पुढील कार्यवाही करावी लागते, मात्र हीच खरेदी-विक्री करताना आणि भाडय़ाने देताना गेले काही महिने सर्व्हर क्रॅश होत असल्यामुळे ग्राहकांना स्टॅम्प डय़ुटी नोंदणी कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागत आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला दररोज कोटय़वधींचा महसूल मिळवून देणाऱया घर खरेदी-विक्री व्यवहारामध्ये सर्व्हरचा खोडा कायमचा मार्गी लावण्याची मागणी सर्वसामान्यांकडून करण्यात येत आहे.
मुंबईत कोरोनाची तिसरी लाट नियंत्रणात आल्यानंतर सर्वात जास्त फटका बसलेल्या बांधकाम क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात सकारात्मक वातावरण दिसून आले. मुंबईत एप्रिलमध्ये सर्वाधिक घरांची विक्री झाली. हे सकारात्मक वातावरण आजही सुरूच आहे. मे आणि जूनमध्येही घर खरेदी-विक्री तसेच घर भाडय़ाने देण्या-घेण्याचे व्यवहार मोठय़ा प्रमाणात होत आहेत, मात्र मालमत्तेसंबंधी हे सर्व व्यवहार करताना स्टॅम्प डय़ुटी भरावी लागते. त्यासाठी स्टॅम्प डय़ुटी नोंदणी कार्यालयात जाऊन स्टॅम्प डय़ुटी भरावी लागते किंवा ऑनलाइन पेमेंट करावे लागते, मात्र काही महिने ऑनलाइन स्टॅम्प डय़ुटी भरताना सर्व्हर क्रॅश होत असल्याच्या तक्रारी मुंबईभरातून येत आहेत. राज्याला सर्वात जास्त महसूल स्टॅम्प डय़ुटीतून मिळत असल्याने सरकारने किंवा महसूल खात्याच्या मंत्र्यांनी, अधिकाऱयांनी यात लक्ष घालून ग्राहकांना होणारा मनःस्ताप आणि ग्राहकांना पडणारे हेलपाटे थांबवावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून स्टॅम्प डय़ुटी भरताना सर्व्हर क्रॅश होत आहे. त्याचा फटका ग्राहकांबरोबर इस्टेट एजंटांनाही बसत आहे. स्टॅम्प डय़ुटीच्या माध्यमातून सरकारला दरदिवशी सर्वात जास्त महसूल मिळतो. त्यामुळे सरकारने याची दखल घेऊन सर्व्हरचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा.
– संजय चावरे, सरचिटणीस, शिवाजी पार्क इस्टेट एजंट आणि वेल्फेअर असोसिएशन



























































