
पूरमुक्त मुंबईसाठी पालिका वेगाने उपाययोजना करीत असल्यामुळे गेल्या दोन वर्षांत पाणी तुंबणारी 386 पैकी तब्बल 282 ठिकाणे कमी करण्यात यश आले आहे. गेल्या एका वर्षातच शिल्लक राहिलेल्या 34 ठिकाणी उपाययोजना केल्यामुळे ही ठिकाणे पूरमुक्त झाली आहेत. पावसाळय़ात साचणारे पाणी उपसण्यासाठी 477 उच्च क्षमतेचे पंप बसवण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली.
पावसाळा तोंडावर आला असला तरी पालिकेच्या माध्यमातून पावसाळापूर्व कामे पूर्ण होत आल्याचे अतिरिक्त आयुक्त वेलरासू यांनी सांगितले. यामध्ये महत्त्वपूर्ण असणाऱया नालेसफाईचे काम 100 टक्के पूर्ण झाले असून आता अधिकचा गाळ काढण्यात येत आहे, तर पाणी तुंबणाऱया ठिकाणी पालिकेच्या माध्यमातून नियोजनबद्ध उपाययोजना करण्यात येत असल्याने ही ठिकाणे कमी होत आहेत. या वर्षी मुंबईभरात पाणी तुंबणारी 104 ठिकाणे शिल्लक होती. यातील 34 ठिकाणी पंप बसवणे, रस्ते-नाल्यांची दुरुस्ती, पर्जन्य जलवाहिन्या टाकणे अशा उपाययोजना केल्यामुळे ही ठिकाणे पूरमुक्त झाली आहेत.
अशी आहे पंपांची व्यवस्था
मुंबई शहर – 187
पश्चिम उपनगर – 166
पूर्व उपनगर – 124
एकूण – 477
हिंदमाता पूरमुक्तीकडे
अतिवृष्टीत पाणी साचल्याने नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी हिंदमाता या ठिकाणी प्रमोद महाजन उद्यान येथे 3.6 कोटी लिटर पाणी साठवणारी भूमिगत टाकी बांधण्यात आली आहे. तर सेंट झेवियर्स मैदानाखाली 2.8 कोटी लिटर्स पाणी साठवण्याची क्षमता असणाऱया भूमिगत टाक्या बांधण्यात आल्या आहेत.
अतिवृष्टीत हिंदमाता या ठिकाणी साचणारे पाणी या भूमिगत टाक्यांमध्ये पंपांच्या सहाय्याने पोहोचवून साठविण्यात येणार असून पाऊस ओसरल्यानंतर या पाण्याचा निचरा केला जाणारे आहे. त्यामुळे सलग चार तास पाऊस पडला तरी या ठिकाणी पाणी तुंबणार नाही असा दावा पालिकेकडून करण्यात आला आहे.
गांधी मार्केटजवळील मिनी पंपिंग स्टेशनमुळे पाण्याचा निचरा वेगाने होत आहे. या परिसराला आणखी दिलासा देण्यासाठी 16 हजार क्युबिक मीटर प्रतितास पाणी उपसा करू शकणारे पंप बसवण्यात आले आहेत. तर मिलन सबवेच्या ठिकाणीदेखील दोन कोटी लिटर पाणी साठवणारी भूमिगत टाकी बांधण्यात येत आहे.



























































